‘इसिस’ची पाळेमुळे खणून काढणार
मुंबई, प्रतिनिधी, दि. 25 - प्रजासत्ताक दिनी घातपाती कारवाया घडवण्याचा कट आखणार्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यासह 14 जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मदतीने अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यातील इसिसची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे.
शनिवारी सकाळी औरंगाबादमधून इसिसशी संबंधित आणखी एकाला एटीएसने अटक केली. 24 तासांत एटीएसने केलेल्या धडक कारवाईतील ही चौथी आणि देशभरातील पंधरावी अटक आहे. संशयितांची कसून चौकशीही सुरू झाली आहे. इंडियन मुजाहिदीनला नेस्तनाबूत केल्यानंतर इसिसची वाढती विषवल्ली उखडून फेकण्यासाठी तपासयंत्रणांनी देशभरात धडक मोहीम हाती घेतली आहे. मुंब्रा येथून अटक केलेला या मोड्युलचा म्होरक्या तसेच स्वयंघोषित आमिर मुदब्बीर मुश्ताक शेख व त्याच्या साथीदारांचा प्रजासत्ताक दिनाच्या
पार्श्वभूमीवर देशात सात ठिकाणी घातपात घडवण्याचा कट उघडकीस आला आहे. पॅरिसप्रमाणे दहशतवादी हल्ला चढवून धार्मिक तसेच पर्यटन स्थळांना लक्ष्य करण्याचा त्यांचा डाव होता. भारतीय सुरक्षायंत्रणांनी इसिसशी संबंधित असलेल्यांविरुद्ध कारवाईचा वेग वाढवला आहे. सिमी आणि इंडियन मुजाहिदीनसाठी काम करणार्या स्लीपर सेल सुरक्षायंत्रणांच्या रडारवर आहेत. या देशव्यापी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या एटीएसने शनिवारी औरंगाबादमधील वैजापूर येथे कारवाई करून मोअझ्झम खान पठाण याला अटक केली. तो या मोड्युलचा तिसर्या क्रमांकाचा कमांडर समजला जातो.
शुक्रवारी सायंकाळी उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे रिझवान अहमद अली नवाजुद्दीन, तर रात्री उशिरा माझगाव येथे हुसैन खान ऊर्फ जमिल यांना अटक झाली. माझगाव सर्कल येथील हार्बर बिल्डिंगमध्ये राहणार्या हुसैन खानच्या अटकेने या परिसरातील रहिवाशांनाही धक्का बसला आहे. रिझवान वगळता अन्य तिन्ही आरोपींना एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे.
24 तासांतील या प्रमुख कारवाईनंतर एटीएसने इसिसशी संबंधित आणखी काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे. काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता तपासयंत्रणांनी वर्तवली आहे. मुदब्बीर शेख सीरियातील शफी अरमारच्या संपर्कात : इसिसच्या वतीने भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी स्थापन झालेल्या जनुद उल् खलिफा ए हिंद या मोड्युलचा आमिर असलेला मुदब्बीर सीरियातील शफी अरमार या इसिसच्या म्होरक्याच्या संपर्कात होता. मूळचा कर्नाटकमधील भटकळ येथील शफी पूर्वी इंडियन मुजाहिदीनसाठी काम करत होता. त्याचा भाऊ सुलताना अरमार याला इसिसचा प्रमुख अबू बकर अल् बगदादी याने भारतातील कारवायांसाठी प्रमुख बनवले होते. इसिसचाच भाग असलेल्या अन्सार अल त्वाहिद या संघटनेचा तो प्रमुख होता. मात्र, मार्च 2015 मध्ये सीरियात झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर शफी हा इसिससाठी काम करू लागल्याची बातमी सर्वप्रथम सकाळने दिली होती. हाच शफी सोशल नेटवर्किंग साईट्सवर युसुफ नावाने सक्रिय आहे. मुदब्बीरसोबत तो फेसबुक आणि व्हॉट्सऍप, स्काईप तसेच अन्य नेटवर्किंग साईटवरून संपर्कात होता. मुदब्बीर आणि शफी देशातील प्रमुख शहरांतील सोशल नेटवर्किंग साईटवर सक्रिय असलेले तरुण, तसेच जुन्या आयएम व सिमीच्या मोड्युलच्या संपर्कात होते, हेसुद्धा स्पष्ट झाल्याचे तपासयंत्रणांतील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
सहा महिन्यांत सहा लाख!
दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडणार्या मुदब्बीरच्या बँक खात्यात काही महिन्यांत सहा लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. ही सगळी रक्कम परदेशातून हवालामार्गे त्याच्या खात्यात आली होती.