Breaking News

सांडपाण्या’तून शुद्ध पाणी देण्याचे धोरण लवकरच

मुंबई, प्रतिनिधी, 29 - सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (एसटीपी) शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर कसा करावा, याबाबत सरकारचे नवे धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे सरकारी वकिलांनी काल उच्च न्यायालयात सांगितले. 
कुंभमेळ्यानंतर गोदावरीची स्वच्छता या विषयावरील याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. इंडिया बुल्स वीजनिर्मिती प्रकल्पाने शुद्ध केलेले सांडपाणी वापरावे, असाही विषय या याचिकेत आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान सरकारने वरील माहिती दिली. हे पाणी काही ठिकाणी शेतीलाही दिले जाते, मात्र याबाबत निश्‍चित धोरण नाही. मुळात अनेक ठिकाणी असे एसटीपी नसल्याने अशुद्ध, प्रदूषित पाणीच नदीत सोडले जाते. 
इंडिया बुल्सच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला कोणते पाणी द्यायचे, याचाही वाद न्यायालयात प्रलंबित आहे. कंपनीतर्फे गोदावरीतील शुद्ध पाणी घेतले जाते. त्यामुळे पुढील शहरांना पिण्यासाठी किंवा शेतीसाठीही पाणी मिळत नाही, अशी तक्रार आहे. त्याऐवजी प्रक्रिया करून शुद्ध केलेले सांडपाणी कंपनीने वापरावे, असाही सरकारचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात सरकारलाच निर्णय घेण्यास न्यायालयाने सांगितले होते. सांडपाण्याचा वापर कोणी व नेमका कसा करावा, याबाबत सरकार लवकरच धोरण आणेल, असे सरकारी वकिलांनी सांगितले. 
गोदावरी स्वच्छता लवकरच सुरू 
कुंभमेळ्यातील शाही स्नानानंतर गोदावरीची स्वच्छता कशी करावी, यासंदर्भात निरीने दिलेल्या अहवालावर आठवडाभरात कृती केली जाईल, असे नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे. यासंदर्भात राजेश पंडित यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्यासमोर झाली. कुंभमेळ्यानंतर गोदावरीची अवस्था काय आहे, किती अस्वच्छता आहे, त्याचे परिणाम काय होतील, नदी स्वच्छ कशी करावी, त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यासंदर्भात निरीने अहवाल दिला आहे. हा अहवाल देण्यास खंडपीठानेच त्यांना सांगितले होते. यासंदर्भात आता विभागीय आयुक्त आठवडाभरात बैठक घेतील व त्यानंतर त्यानुसार प्रत्यक्ष कृती करून त्याचा अहवाल दिला जाईल, असे सरकारी वकिलांनी न्यायालयास सांगितले.