एका चहाच्या बदल्यात देशाने सात जवान गमावले
मुंबई, प्रतिनिधी, दि. 6 - भाई, बंदुक की गोली की गुँज में वार्ता कैसे हो सकती है? असा सवाल आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस सत्तेत असताना केला होता. मोदींनी तेव्हा केलेला हा सवाल रास्तच होता. आता पठाणकोट हल्यानंतर आम्ही तेच म्हणत आहे. तेव्हाचे मोदी कुठे आहेत? पठाणकोटमधील बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी आमच्या कानठळ्या बसल्या आहेत. तरीही पठाणकोट हल्ल्याचा बदला आपण घेणार नसू तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरील शस्त्रांचे चलत प्रदर्शन दाखविण्यात अर्थ नाही. आमच्या पंतप्रधानांनी शरीफ यांच्याबरोबर चहापान घेतले आणि या चहाच्या बदल्यात आम्ही पठाणकोटला सात जवान गमावले अशा शब्दांत शिवसेनेने मोदींवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरत्या वर्षाअखेर पाकिस्तानला अचानक भेट दिली होती. मोदी स्वत:च लाहोरला गेले व नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापला. या निर्णयाने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानला संवादाची भाषा कळत नाही अशी भूमिका शिवसेनेने केली होती. पठाणकोट हल्ल्यानंतर शिवसेना जे म्हणत होते ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या हल्ल्यानंतर शिवसेनेने मोदींवर शरसंधान साधण्याची संधी दवडली नाही. शिवसेनेने मोदींवर नितीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
फक्त सहा-सात दहशतवादी घुसवून पाकिस्तानने आपल्याविरुद्ध युद्धच पुकारले आहे. हवाई दलाच्या पंजाबमधील पठाणकोट येथील तळावर मूठभर दहशतवादी जोरदार हल्ला करतात व 72 तासांनंतरही हे युद्ध संपत नाही. हे प्रकरण फक्त चिंता करण्यासारखे नाही तर आपल्या प्रचंड लष्करी सामर्थ्याचे जे ढोल आपण वाजवत असतो ते ढोल फोडणारा हा भयंकर प्रकार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत व देशाची अंतर्गत सुरक्षाही साफ कोसळल्याचा हा पुरावा
आहे. देशावर हे असे परचक्र आले असताना सरकारविरोधी सूर काढणे योग्य नाही. राजकीय टीका-टिपण्या न करता सरकारी कारवाईस पाठिंबा द्यावा. कारण हा देशाच्या सुरक्षेचा मामला आहे, पण देशाच्या सुरक्षेचा मामला असला तरी राज्यकर्ते गंभीर आहेत काय? हजारो सैनिक, रणगाडे, पंजाबचे पोलीस पठाणकोटला आहेत तरीही फक्त सहा-सात दहशतवाद्यांनी या लष्करी सामर्थ्यास जेरीस आणले. सात जवान या युद्धात शहीद झाले व पन्नासावर घायाळ झाले. हा हिशेब तपासला तर फक्त सहा माथेफिरू दहशतवाद्यांची किंमत चुकवून पाकिस्तानने हिंदुस्थानची अब्रू घालवली आहे. देशाचे संरक्षणमंत्री, पंतप्रधान वगैरे मंडळींनी धडा घ्यावा व सुधारणा कराव्यात, असा सल्ला शिवसेनेने मोदींना दिला आहे.