मंत्र्यांचेही आदेश न ऐकणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई!: मुख्यमंत्री
मुंबई, प्रतिनिधी, दि. 6 - जनतेच्या हिताच्या योजना सरकार आखत असतानाही काही अधिकारी जाणून बुजून मंत्र्यांच्या योजना लालफितीत अडकवत असल्याचे लक्षात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले आहेत. अशा अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याचा विचार ते करत असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांनीही बोलताना अशा अधिकार्यांवर कठोर कारवाई करणार सांगितले आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी काम करत नसल्याचेे आणि फाइलवर सही केली असतानाही ती अडवून ठेवत असल्याने योजना मार्गी लागत नसल्याची काही मंत्र्यांनीही थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनीही नागपुरातील एका कार्यक्रमात अधिकारी ऐकत नसल्याचे कबूल केले होते. मात्र, आता नव्या वर्षात अधिकार्यांना मंत्र्यांचे ऐकावेच लागेल आणि योजना त्वरित मंजूर कराव्या लागतील, अशी माहिती एका वरिष्ठ सचिवाने दिली.
भाजप सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा खासगी स्टाफ बदलला, परंतु सचिव स्तरावरील अधिकारी मात्र तेच ठेवले. गेल्या 15 वर्षांपासून आघाडी सरकारमध्ये काम केलेले असल्याने या सचिवांना प्रत्येक फाइलची चांगलीच माहिती आहे. त्यामुळे कुठली फाइल कशी अडवायची हे त्यांना ठाऊक असल्याने ती अडकवली जाते, अशी तक्रार एका मंत्र्यानेच प्रस्तुत प्रतिनिधीकडे केली होती. यामुळेच एकनाथ खडसे यांची फाइल वित्त विभागातील अधिकार्यांनीच अडवून ठेवली होती. त्याचे खापर खडसे यांनी वित्तमंत्र्यांवरच फोडले होते. गृहनिर्माण विभागाच्याही अनेक योजना अधिकार्यांमुळेच एक वर्ष झाले तरी मार्गी लागल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या योजना मात्र युद्धपातळीवर मार्गी लागत असल्याने अनेक मंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व तक्रार केली होती.