Breaking News

निवृत्त सफाई कामगारांच्या जागेवर त्यांच्या पाल्यांची नियुक्तीची मागणी



 नाशिक/प्रतिनिधी। 11 - सफाई कामगारांच्या कुटुंबातील पती-पत्नी दोघेही शासकीय-निमशासकीय सेवेतून सफाई कामगार म्हणून निवृत्त झाल्यास दोहोंच्या जागेवर केवळ एकाच वारसास सेवेत घेण्याचा नियम बदलण्याची मागणी भारतीय मानव कल्याण महासंघाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 
निवेदनात म्हटले आहे की, लाड-पागे समितीच्या नियमानुसार सफाई कामगार असलेल्या पती-पत्नी यांच्या जागेवर त्यांच्या वारसांना सेवेत घेतले जात होते. परंतु शासनाने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात पती-पत्नी दोघेही स्वेच्छा अथवा सेवानवृत्त झाल्यास दोहोंच्या जागेवर केवळ एकाच वारसाला सेवेत घेण्याचा नियम आहे. 
या नियमामुळे वाल्मीकी, मेहतर व मेघवाळ समाजातील तरुण मुलांचे नुकसान होणार असून, त्यांच्यावर अन्याय होणार आहे. शासनाने पती-पत्नी या दोहोंच्या जागांवर कुटुंबातील दोघांना वारसा हक्काने सेवेत घ्यावे आणि नियमात बदल करावा. 
सदर बदल न केल्यास येत्या 20 जानेवारीला मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष डॉ. अनुपम बेगी, अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद परमार, रियाज कुरेशी, मटुलाल चुनीयान, राजेश सौदे, अरुण गिरजे, ईश्‍वर गलोद, सुरेश दलोड, प्रदीप शेरगिल आदिंनी दिला आहे.