Breaking News

चेन्नई पूरग्रस्तांना नाशकातील मुस्लिमांची मदत


 नाशिक/प्रतिनिधी। 11 - महिनाभरापूर्वी चेन्नईत महापुराने थैमान घातले होते. यात अनेकांचे संसार वाहून गेले, तर बहुसंख्य कुटुंबे बेघर झाली. चेन्नईच्या पूरग्रस्तांना शहरातील मुस्लीम समुदायानेदेखील आर्थिक मदतीचा हात पुढे करत सुमारे एकूण दोन लाख रुपयांचे धनादेश प्रदान केले आहेत. 
चेन्नई पूरग्रस्तांना शहरातील सुन्नी मरकजी सीरत समितीमार्फत खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी पत्रकान्वये सर्व मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांना मदतीचे आवाहन केले होते. यानुसार पखाल रोडवरील गुलशन कॉलनी परिसरात राहणार्या मूळ चेन्नईच्या रहिवाशांनी मशिदींमध्ये जाऊन मदत संकलित केली. यामध्ये सुमारे एक लाख 33 हजार रुपयांचा मदतनिधी संकलित झाला. युसुफिया सोशल फाउंडेशनच्या वतीने 21 हजार रुपये आणि सय्यद सादिकशाह हुसेनी दिलासा समितीद्वारे चाळीस हजारांसह जुने नाशिकमधील काही दानशूरांनीही मदत दिल्याने एकूण दोन लाखांचा निधी उभा राहिला. हा निधी समितीच्या बॅँक खात्यामध्ये जमा करून त्या निधीचे प्रत्येकी दोन हजाराचे एकूण शंभर धनादेश तयार करून चेन्नई पुरग्रस्तांच्या शंभर कुटुंबीयांपर्यंत पोहचविले आहे. शुक्रवारी (दि.8) हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गा शरीफमध्ये हिसामुद्दीन अशरफी यांनी मूळ चेन्नईचे रहिवासी असलेल्या नागरिकांकडे हे धनादेश सुपूर्द केले. यावेळी मौलाना हाफीज जमाल, हाजी मीर मुख्तार अशरफी, हाजी मुजाहीद शेख, हाजी अलिमोद्दीन पिरजादा आदि उपस्थित होते.