Breaking News

दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात वेळ दवडू नका- अमेरिका


वॉशिंग्टन, 9 - पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला करण्याचा कट रचणार्‍या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात वेळ दवडू नका, असा ‘सल्ला‘ अमेरिकेने शनिवार पाकिस्तानला दिला. या हल्ल्याशी संबंधितांवर कारवाई करण्यास दडपण आणण्यासाठी आता अमेरिकेनेही पाकिस्तानला काही खडे बोल सुनावले आहेत. 
हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील संघटनांचा हात होता, असे पुरावे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिले आहेत. ‘या पुराव्यांवर आधारित कारवाई करू, असे त्यांनी (पाकिस्तान) जाहीररित्या सांगितले आहे. कुठल्याही दहशतवादी संघटनांबाबत सौम्य धोरण नसेल, असेही त्यांनी सांगितले आहे. आता या घोषणांना कृतीची जोड मिळते की नाही, याकडे आमचे लक्ष आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करण्यात पाकिस्तानने चालढकल केली. आता पठाणकोट हल्ल्यातील संबंधितांना पाठीशी घालण्यासाठी पाकिस्तानने लंगडे समर्थन करू नये,‘ अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेच्या गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने पाकिस्तानला इशारा दिला. 
अर्थात, ‘ही कारवाई करण्यासाठी पाकिस्तानी सरकारला पुरेसा वेळ दिला पाहिजे, असेही अमेरिकेला वाटते,‘ अशी पुस्तीही त्या अधिकार्‍याने जोडली. त्याचबरोबर, ‘पूर्वीप्रमाणे पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालणार नाही‘ अशी अपेक्षाही त्याने
व्यक्त केली.