फक्त 6 अतिरेक्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांना रोखता आले नाही - जैश-ए-मोहम्मद
नवी दिल्ली, 9 - भारत सरकार भित्रे असून ते केवळ आमच्यावर आरोप करत सुटले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार आणि फतेह सिंग यांना क्रूरपणे मारल्याचे सांगत भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय ढिसाळ असल्याची टीका जैश-ए-मोहम्मदकडून करण्यात आली आहे.
पठाणकोटमध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणा केवळ सहा दहशतवाद्यांचा मुकाबला करू शकल्या नाहीत, अशा शब्दांत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारताची खिल्ली उडविली आहे. पाकिस्तानमधील www.alqalamionline.com या संकेतस्थळावर भारतीय सुरक्षा यंत्रणांची खिल्ली उडवणारी ध्वनिफीत जैश-ए-मोहम्मदने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पठाणकोट हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्य, गाड्या, रणगाडे आणि हेलिकॉप्टर्सला कशाप्रकारे लक्ष्य केले हे सांगण्यात आले आहे. ध्वनिफितीत पठाणकोट हल्ल्याशी संबंधित अनेक गोष्टींबाबत खुलासा करण्यात आला असून हा हल्ला कसा घडवण्यात आला तेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याच्या बहावलपूर या शहरातून प्रसिद्ध होणा-या एका उर्दू वृत्तपत्रातही 13 मिनिटांच्या या ध्वनिचित्रफितीसंदर्भात मजकूर छापण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार आणि फतेह सिंग यांना क्रूरपणे मारल्याचे सांगत भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय ढिसाळ असल्याची टीका जैश-ए-मोहम्मदकडून करण्यात आली आहे.