Breaking News

सामाजिक न्याय विभागाचा स्मशानात एक रात्र उपक्रम दिशादर्शक

सांगली, 11 - सामाजिक न्याय विभागाचा जादूटोणा भानामती या अंधश्रध्दांना समूळ नष्ट करण्यासाठी स्मशानात एक रात्र हा उपक्रम राज्यासाठी किंबुहुना देशासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले. 
कवठेमहांकाळ येथील सर्वधर्मीय स्मशानभूमी येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम 2013 अंतर्गत वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत चमत्कार व प्रात्याक्षिकांसह जाणीवजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागांतर्गत जादूटोणाविरोधी कायदा जाणीवजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती तथा पीआयएमसीतर्फे समाज प्रबोधनासाठी हा कार्यकङ्घम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार सुमनताई पाटील, माजी राज्य मंत्री अजितराव घोरपडे, अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, विभागीय पोलीस उपअधीक्षक नागनाथ वाकोडे, जि. प. आरोग्य सभापती गजानन कोठावळे, पंचायत समिती सभापती वैशाली पाटील, सरपंच सुनिल माळी, तहसिलदार सचिन डोंगरे,  समाज कल्याणचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा पीआयएमसीचे सदस्य सचिव राधाकिसन देवढे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व जादूटोणाविरोधी कायदा जाणीवजागृती अंमलबजावणी समितीचे सदस्य  शाहीन शेख आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड पुढे म्हणाले, तरुण पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी असे कार्यक्रम गावोगावी आयोजित करणे महत्त्वाचे ठरेल. विशेषत: स्मशानभूृमीमध्ये महिलांना येणे बंदी असते. त्यामुळे या ठिकाणी जास्त अंधश्रध्दा वाढीस लागते. पण या ठिकाणी उपस्थित  असलेल्या महिलांची गर्दी पाहता आता समाजात अंधश्रध्दा समूळ नष्ट होण्यास फार काळ लागणार नाही, अशी आशा व्यक्त करून श्री. गायकवाड यांनी हा जाणीव जागृतीचा कार्यक्रम सदैव स्मरणात राहील. याही पुढच्या काळात जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाच्या वतीने अशा कार्यकङ्घमांची प्रभावी अंमलबजावणी  करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.  यावेळी आमदार सुमनताई पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक लक्ष्मीकांत पाटील, माजी मंत्री अजितराव घारेपडे, सरपंच सुनिल माळी आदिंनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक सिराज ईनामदार, उपसरपंच चंद्रशेखर सगरे, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, समाज कल्याण विभागाचे अधिकारी,  कर्मचारी, कवठेमहांकाळ पंचक्रोेशीतील नागरिक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्यासंख्येंने उपस्थित होते.