Breaking News

सांगलीत रात्री अतिक्रमण हटविण्याची वेळ कां आली ?


सांगली, 11 - जिल्हाधिकारी व महापालिकेचे प्रभारी आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. विशेषतः शंभरफुटी रस्ता हा आपल्या मालकीचा असल्यासारखे वागणार्‍या व्यावसायिकांकडे आतापर्यंत कोणा आयुक्तांनी पूर्णतः दुर्लक्ष केले होते. परंतु यावेळी श्री. गायकवाड यांनी त्यांच्या अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला आणि ही ऐतिहासिक कामगिरी झाली असल्याबद्दल नागरिक त्यांना धन्यवाद देत आहेत.
शहरातील वाहतुकीची वाढती गर्दी कमी करावी या उद्देशाने कोल्हापूर रोड नजिकचा शंभरफुटी रस्ता 
शहराबाहेरुन थेट विश्रामबागपर्यंत मिरज रोडला जोडला आहे परंतु या शंभरफुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहने दुरुस्ती करणार्‍या व्यावसायिकांनी रस्ता पूर्णपणे व्यापला होता. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहने नेताना खूपच अडचण निर्माण झाली होती. आता शंभरफुटीवरिल अतिक्रमणे हटल्याने रस्त्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. या शंभरफुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारी व संपूर्ण डांबरीकरण केले तरच अतिक्रमणे कायमची हटतील. अन्यथा येरे माझ्या मागल्या त्यातली अवस्था होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरील व्यावसायिकांना राजकारण्यांचा आशिर्वाद होता त्यामुळे अतिक्रमणे वाढत गेली आणि संपूर्ण रस्ताच अतिक्रमणाने व्यापला गेला होता. आता रस्ता रिकामा झाला आहे. तरीही काही व्यावसाईक या रस्त्यावर सायंकाळनंतर पुन्हा काम करतात. त्यांच्यावर कारवाई म्हणूनच श्री. गायकवाड यांनी रात्रीहि अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमणकर्त्या व्यावसाईकांपुढे नवी समस्या उभी राहिली आहे. अतिक्रमण काढल्याने आपल्या व्यावसायावर परिणाम झाल्याची अनेकांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शंभरफुटी जुनी कित्येक वर्षापासून ठाण मांडलेली मंडळी चांगलीच अडचणीत आली असून आपल्या धंद्याला आश्रय मिळावा, अशी विनंती करु लागली आहेत. शहराच्या अनेक भागात खूपच अतिक्रमणे आहेत. रस्त्यावर जनावरांचे गोठे, काही ठिकाणी कचरा टाकण्यासाठी उकिरंडे, शेणी थापण्याच्या जागांसाठी नागरिक सर्रास पालिकेच्या जागांच्या जागांचा वापर करीत आहेत. त्याचप्रमाणे एस. टी. स्थानकाच्या परिसरात खाद्यपदार्थ विकणार्‍यांची अतिक्रमणे काढून टाकली तरी परत त्या ठिकाणी त्यांचे गाडे सर्रासपणे चालू असतात ती मंडळी सकाळी व्यवसायासाठीचे घाण पाणी, धान्याचे उष्टे तिथेच टाकून निघून जातात. त्यामुळे त्या परिसरात त्याच उष्टे अन्नावर माशा, डांस घोंगावतात त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने कधीच लक्ष दिले नाही. तसेच त्या व्यावसाईकांनी आपले गाळे इतरांना भाड्याने देवून आपले हातगाडे रस्त्यावर पुन्हा उभे केले आहेत. त्यांनाहि कोणाचे अभय असल्याचे बोलले जात आहे. एस. टी. स्थानकाच्या तिन्ही बाजूने या व्यावसाईकांची मनमानी चालू आहे. परवानाधारक गाळ्यांचे व्यावसाईक पुन्हा रस्त्यावर खुर्च्या मांडून ग्राहकांना रस्त्यावर नाष्टा, चहा देतात. यामुळे वाहतुकीची कोंडी कायमच होते. शास्त्री चौक ते कोल्हापूर रस्त्यावरहि व्यावसाईकांची अतिक्रमणे वाढली आहेत. परवा शास्त्री चौकातील अतिक्रमणे हटविली असली तरी पुन्हा तेथे रस्त्यावर व्यवसाय चालू झाला आहे. एस. टी. बस स्थानकापासून शहरात जाणारा रस्ता पाहता या रस्त्यावर एका बाजूस मोटारी तर दुसर्‍या बाजूस रिक्षा व मोटार सायकलींची पार्किंगला परवानगी देण्यात आली आहे. त्याला मर्यादा राहिलेली नाही. शेकडो वाहने उभा केल्याने वाहनांच्या वाहतुकीला अडचणीचे झाले आहे. तसेच तो एकमार्गी (वनवे) असताना उलट्या मार्गाने लोक मोटारी, रिक्षा व मोटारी सायकली घेऊन बिनदिक्कतपणे येतात. त्यामुळे अपघात घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही दिशेला एकेरी वाहतूक असे मोठे फलक लावण्याची गरज आहे. या रस्त्यावरुन शहरात मोठ्या प्रमाणात वाहमे जात असतात.अतिक्रमणाचे पडसाद शहराच चांगलेच उमटले आहेत. त्यामुळे काहींचे नुकसान झाले असेल. परंतु कायद्याचे उल्लंघन करुन वागणार्‍यांना आता चाप बसणार आहे. यापूर्वी पालिकेचे अतिक्रमणे पथकाने शहरात अतिक्रमण काढण्याचे वृत्त कळताच त्या भागातील राजकारणी मंडळी त्याला विरोध करावयाची. परंतु यावेळी हस्तक्षेप थांबला आहे. अन्यथा वर्षानुवर्षे अतिक्रमणे राहिली असती आणि नागरिकांना रस्त्यावरुन जाता आले नसते. त्यामुळे नववर्षात जिल्हाधिकार्‍यांनी हाती घेतलेली ही मोहिम संपूर्ण शहरात राबवावी. त्यासाठी गल्ली-बोळांचा सर्वेक्षण करुन अहवाल घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.