Breaking News

तासगांव भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत राडाबाजी


सांगली, 11 - तासगाव तालुक्यात मोजक्याच कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपचे पदाधिकारी निवडणुकीत अस्तित्व दाखवून देण्याइतपत कामगिरी बजावायचे. मात्र संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तालुक्यात भाजप दमदार झाला. तेव्हापासून काका गट म्हणजेच भाजप असे समीकरण झाले. त्यामुळे घुसमट होत असलेल्या भाजपच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी शिवेसेनेचा रस्ता धरला आहे. तर भाजपचे तालुकाध्यक्षही नामधारीच राहिलेले असून, काका गटाच्या प्रभावाने जुन्या भाजपेयींचे अस्तित्व नामधारी राहिले आहे.
तासगाव तालुक्यात आबा गट आणि काका गट वगळता इतर पक्ष आणि संघटनांचे अस्तित्व तसे तोकडेच राहिले आहे. खासदार संजयकाका पाटील आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील हे नेते ज्या पक्षात तेच पक्ष 
तालुक्यात सक्षम होते. संजयकाकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आबा आणि काका गट राष्ट्रवादीच्या 
माध्यमातून एका झेंड्याखाली आले. त्यावेळी तालुक्यात मर्यादित कार्यकर्त्यांचे जाळे असणार्‍या भाजपच्या 
कार्यकर्त्यांनी या दोन्ही नेत्यांना आव्हान देत, चार वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची 
निवडणूक लढवली होती.  तालुक्यात भाजपचे अस्तित्व कायम राखण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सातत्याने प्रयत्न केला होता. तरीही भाजपची ताकद मर्यादितच राहिली होती.
लोकसभा निवडणुकीच्या काळात संजयकाकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे खासदार म्हणून जिल्हा 
नेतृत्वावर शिक्कामोर्तबही झाले. संजयकाकांसोबत त्यांच्या समर्थकांनीही भाजपची वाट धरली. त्यामुळे तालुक्यात पहिल्यांदाच भाजपचा वरचष्मा दिसू लागला. काही महिन्यांपूर्वी तासगाव नगरपालिकेत सुशीला साळुखेंनी भाजपच्या नगराध्यक्षा होण्याचा मान मिळवला. तालुक्यात एकीकडे भाजपची राजकीय आगेकुच सुरु असताना, दुसरीकडे जुन्या भाजप कार्यकर्त्यांची घुसमट बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे तासगाव शहरप्रमुख संग्राम पाटील, जिल्हा युवा मोर्चाचे सागर बाबर यांच्यासह पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. काका गटाच्या वर्चस्वापुढे जुन्या भाजपवाल्यांचे अस्तित्व झाकोळले गेल्याने, त्यांची घुसमट होत होती. त्यामुळेच काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे तालुकाध्यक्षपददेखील केवळ नामधारीच आहे. तालुक्यात पक्षामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीत तालुकाध्यक्षांचा वावर कोठेच दिसून येत नाही. खासदार गटाकडून तर तालुकाध्यक्षपदच अदखलपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे तालुकाध्यक्षांसह जुन्या निष्ठावंत भाजपप्रेमींची नव्या गटासोबत फरफट होत असल्याचे दिसून येत आहे.