Breaking News

स्थायी समितीचे सात सदस्य निवृत्त होणार


 अहमदनगर । प्रतिनिधी । 13 -  मनपा स्थायी समितीच्या सात सदस्यांची मुदत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात संपुष्टात येत आहे. तर 1 सदस्य अंजिक्य बोरकर यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईमुळे एक जागा रिक्त आहे. जानेवारीच्या अखेरीस नव्याने सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून यात राष्ट्रवादी 4, काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी 1 सदस्य असून दोन सदस्यांची निवड महासभेकडून करण्यात येणार आहे. मनपाची पोटनिवडणूक नुकतीच संपल्यामुळे आता इच्छुकांनी स्थायीसाठी मोर्चे बांधणे सुरु केले आहे.
मागील वर्षी 30 जानेवारीला आठ सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त होवून 31 जानेवारीला नव्याने आठ सदस्यांची निवड करण्यात आली होती. यात मनसेची गणेश भोसले, काँग्रेसच्या रुपाली वारे, राष्ट्रवादीचे समद खान, सेनेचे अनिल बोरुडे, छाया तिवारी, विद्या खैरे, भाजपचे श्रीपाद छिंदम, उषा नलावडे यांचा समावेेश आहे. 
त्यांची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. तर राष्ट्रवादीचे संपत बारस्कर,कुमार वाकळे, मंगळा गुंदेचा, काँग्रेसचे दिप चव्हाण, सुनिता कांबळे, सेनेचे सचिन जाधव, अपक्ष उषा ठाणगे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सातही जण निवृत्त होणार आहेत. दिप चव्हाण व उषा ठाणगे यांची महासभेद्वारे निवड करण्यात आली होती.31 जानेवारीपर्यंत नवीन सदस्यांची निवड होणार आहे. सभापती भोसले यांचा एक वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असला तरी ते राजीनामा देणार आहे.