अभिनेत्री रेखाचे ‘लव्ह लाइफ‘
मुंबई- अभिनेत्री रेखाचे ‘लव्ह लाइफ‘ हा बॉलिवूडमधील काहीसा गूढ आणि सर्वांत उत्सुकतेचा विषय नेहमीच चर्चेत असतो. मात्र, रेखाला प्रेम करायला कुणी शिकवलं...? बिग बी असा तुमचा अंदाज असेल तर तो चूक आहे. निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांनीच आपल्याला प्रेम करायला शिकविले अशी कबुली रेखाने दिली आहे.
यश चोप्रा स्मृती पुरस्कार सोहळ्यामध्ये रेखाने वरील विधान केले. यावेळी तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर बोलताना रेखाने ही प्रतिक्रिया दिली. अमिताभ, जया आणि रेखा यांचा ‘सिलसिला‘ चांगलाच गाजला होता. त्यामुळे रेखाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. यश चोप्रा यांचे चित्रपट बघितल्यामुळेच प्रेम काय असते ते कळले. तसेच, शायरी लिहायलाही त्यांनीच आपल्याला प्रेरित केलं असंही रेखा म्हणाली.