Breaking News

निवृत्त कर्मचार्‍यांना सेवेत घेतांना अल्प पेंशनधारक यांचा प्राधान्याने विचार करावा ः कमांडर राऊत


बुलडाणा (प्रतिनिधी), 11 -सेवानिवृत्त कर्मचारी तसेच अधिकार्‍यांना 70 वर्षे वयापर्यंत कंत्राटी पध्दतीने कामावर घेण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाचे ईपीएस 95 संघटनेचे राष्ट्रीय सचिव कमांडर अशोक राऊत यांनी स्वागत केले आहे. जेष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा, संयमाचा व विवेकशिलतेचा फायदा कोणत्याही कार्यालयाला किंवा संगठनाला मोठ्या प्रमाणात होवू शकतो. याशिवाय कार्यरत राहून जेष्ठांनी आपली सेवा दिल्यास त्या कार्यालयाच्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ होवू शकेल असे ते म्हणाले.
मात्र शासनाने जेष्ठांना ह्या कंत्राटी नोकर्‍या देतांना अल्प पेंशनधारक ईपीएस-95 च्या निवृत्त कर्मचारी अधिकार्‍यांना प्राधान्य देवून त्यांचा प्रामुख्याने विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कमांउर अशोक राऊत यांनी या अगोदर देशभरातील सर्व लोकसभेच्या व राज्यसभेच्या खासदारांना वैयक्तिक पत्रे लिहून या कायद्यात बदल करण्याची मनधरणी केली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर मा.मुख्यमंत्र्यांनी ईपीएस 95 योजनेखालील सेवानिवृत्त झालेल्या अत्यल्प पेंशनधारकांना कंत्राटी पध्दतीने पुन्हा नोकरीवर घेण्याबाबत गंभीरतेने विचार करावा अशी जाहीर विनंती कमांडर अशोक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेली आहे.