शंभरफुटीवरील पक्क्या अनाधिकृत इमारतीवर हातोडा
सांगली ः दि. 9 - येथील राजर्षी शाहू रस्त्यावर (शंभर फुटी) आज सलग तिसर्या दिवशी अतिक्रमण हटाओ मोहीम सुरूच राहिली. दिवसभरात 67 विविध अतिक्रमणे हटवली. उद्याही याच परिसरात ही मोहीम सुरू राहणार आहे. दोन दिवसांत मोकळ्या केलेल्या रस्त्याचे मुरमीकरण करण्यात येणार आहे. पुढील काळात पक्क्या अनधिकृत इमारतींवर हातोडा टाकण्याचे संकेत आज प्रशासनाने दिले.
आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारल्यापासून जिल्हाधिकार्यांनी किमान रस्ते मोकळे करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते शाहू रस्ता शंभर फुटी दिसू लागला आहे. आज या रस्त्यावरील ग्रीन ताज हॉटेलपर्यंतची अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यात रस्त्यावरील पक्की बांधकामे हटवण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावर लावलेली आणि सडत पडलेली दहा वाहने हटवण्यात आली. महापालिकेच्या या मोहिमेचा सकारात्मक परिणाम म्हणजे अनेकांनी स्वतःहून काही ठिकाणी रस्त्यावरील फलक हटवले. या रस्त्यावर जागोजागी असलेली झाडे काढून टाकावी लागणार आहेत.
वीज कंपनीने रस्त्याची साईडपट्टी सोडून मध्येच विजेचे खांब उभे केले आहेत. साईड मार्जीन न सोडता या रस्त्यावर उभारलेल्या शेड तसेच विना परवाना इमारतींमुळे हे खांब इमारतींपासून दूर घ्यावे लागल्याचे दिसते. त्याचा गैरफायदा घेत मालमत्ताधारकांनी सर्रास अतिक्रमणे केली आहे. ती मोडून काढण्यासाठी महापालिकेला कठोर कारवाई करणे भाग आहे. यादृष्टीने या रस्त्यावरील विना परवाना 180 इमारतधारक, तसेच अशा विना साईड मार्जिनच्या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.