मेट्रोतून प्रवास करतांना अस्वच्छतेचे’ दर्शन
मुंबई, प्रतिनिधी, दि. 5 - घाटकोपरमधील भीमनगर टेकडीजवळ मेट्रो रेल्वेला लागूनच मोठी वस्ती आहे. या टेकडीजवळील वस्तीवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व अस्वच्छतेचे दर्शने मेट्रोतूनच होत असल्याने शहराची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्तांना मेट्रोमधून सफर करताना या टेकडीवर पसरलेले कचर्याचे साम्राज्य दिसले. त्यांनी तातडीने टेकडीच्या स्वच्छतेचे आदेश दिले होते. त्यानंतर मोठा गाजावाजा करीत दि सह्याद्री एडव्हेंचर क्लबच्या गिर्यारोहकांच्या मदतीने पालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेविका रितू तावडे यांनी स्वच्छता अभियान राबवले होते. अनेक प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली होती; मात्र आता या टेकडीची अवस्था पुन्हा आधीसारखीच झाली आहे. मेट्रो प्रकल्प उभारताना येथील वस्तीसाठी एमएमआरडीएने मलनिःसारण वाहिनी आणि या टेकडीवरील सांडपाणी वाहून नेणारी गटारेच बनवून दिली नाहीत. त्यामुळे टेकडीवरील गटारांचे पाणी मेट्रोखालील अंधेरी-घाटकोपर रस्त्यावर येते. त्याचा वाहनचालक व पादचार्यांना त्रास होतो. मुंबईमध्ये साथरोग झपाट्याने पसरत असताना ही परिस्थिती त्यात भर घालते; तसेच परिसरात खूप दुर्गंधी पसरली आहे. भीमनगर टेकडीला मेट्रोचे काम चालू असताना मोठी संरक्षक भिंत बांधली गेली; मात्र या संरक्षक भिंतीजवळ गटारे आणि शौचालयाचे पाणी सोडण्यात आले. हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी या रस्त्यावर येत असल्याने रोग पसरण्याची भीती वाढली आहे; तसेच संरक्षक भिंतही पाण्याने कमकुवत होऊन ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत अनेक पोलिस अधिकारी, अभियंते, मोठे उद्योजक व अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी टेकडी स्वच्छ करून हा विभाग कायमस्वरूपी स्वच्छ राहील असे आश्वासन दिले होते; मात्र सध्याची येथील परिस्थिती पाहता त्यांना याचा विसर पडल्याचे दिसते.
सध्या भीमनगर टेकडीवर अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. ठिकठिकाणी कचर्याचे ढीग या संरक्षक भिंतीवर पडलेले आहेत. सर्व गटारे रस्त्यावर सोडून दिली आहेत. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी या विभागात फिरकतही नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले. इथे कचरा टाकण्याची सोय नाही. गटारे नसल्याने सांडपाणी अंधेरी-घाटकोपर रस्त्यावर सोडण्यात येते.