Breaking News

भाजपा प्रवक्त्यांनी आळवला साहित्य संमेलन अध्यक्षाविरोधात राग

 पुणे (प्रतिनिधी)। 30 - वाद न घालताही साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडू शकतात, असा टोला भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी श्रीपाल सबनीस यांना लगावला. कलारंग संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कलागौरव पुरस्कारात त्यांनी हा राग आळवला.
श्रीपाल सबनीस हे पिंपरी-चिंचवड शहरात नुकत्याच पार पडलेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून सबनीस यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजपाचे खासदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला होता. यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले होते. मात्र त्यानंतर सबनीस यांच्या माफीनाम्यानंतर हा वाद शमला होता. नंतर विरोधकच संमेलनाच्या व्यासपीठावर चमकले होते. त्यामुळे सबनीस यांच्या विरोधातील भाजपा समर्थकांचा राग निवळला असल्याचे सर्वांना वाटत होते. मात्र काल भाजपा प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आजही सबनीस 

यांच्याविषयी भाजपा समर्थकांमध्ये राग असल्याचे समोर आले आहे. कलारंग संस्थेच्या कलागौरव पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे यांच्याविषयी बोलताना भंडारी म्हणाले की, फ. मु. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात कोणताही वाद उभा न करता साहित्य संमेलन यशस्वी करून दाखविले होते. त्यामुळे कोणताही वाद न घालताही साहित्य संमेलन पार पाडता येते याचे फ. मु. शिंदे हे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे भंडारी म्हणाले. त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता, हे सुजाण प्रेक्षकांना तात्काळ लक्षात आले व हास्याचे फवारे उडाले. यामुळे मात्र आजही भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मनातील श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात असलेला राग अजूनही धुसमत असच्याचे दिसत आहे.