Breaking News

सावित्रीबाई फुले विद्यापीठात इनोव्हेशन हब तयार व्हावे ः मुख्यमंत्री

 पुणे (प्रतिनिधी)। 30 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्टार्ट अप , स्टॅन्ड अप इंडियासाठी तरुणाईला संशोधन संधी मिळाव्यात यासाठी इनोव्हेशन हब तयार करावे, यासाठी योग्यती सर्व प्रकारची मदत राज्यशासनाकडून केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या शुभहस्ते झाले. त्या प्रसंगीच्या समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,  आमदार सर्वश्री विजय काळे, लक्ष्मण जगताप, जयदेव गायकवाड, श्रीमती. माधुरी मिसाळ, महेश लांडगे, महापौर दत्तात्रय धनकवडे, कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मालोजी राजे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू आदी मान्यवर उपस्थित होते.  मुख्यमंत्री म्हणाले की, पुणे विद्यापीठाचे नाव देशात आणि जगातही आदराने घेतले जाते आहे. आज भारतांमध्ये 60 ते 70 कोटी तरुणाई आहे. त्यांना असीमित संधी आहेत. समाजाच्या प्रत्येक समस्येवर संशोधन करण्याची, समाजाच्या अडचणी दूर करण्याचा ही तरुण पिढी विचार करीत आहे. अमेरिके
तील सिलीकॉनव्हॅलीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य बुध्दी भारतीयांची आहे. सिंगापूरमध्येही मुख्य बुध्दी भारतीयांचीच आहे. आज समाजापुढील आव्हाने सोडविण्यासाठी, तरुणाईला संशोधनासाठी  संधी मिळावी यासाठी विद्यापीठात इनोव्हेशन हब तयार करावे. यासाठी शासन सर्व ती मदत विद्यापीठाला करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.  राज्यातील महापालिकाच्या विकास आराखड्यामध्ये वस्तीगृहांसाठी आरक्षण ठेवावे असे आदेशच देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने या विद्यापीठाच्या वस्तीगृहाना जादा एफएसआय द्यावा.  मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वस्तीगृहाच्या बांधकामास राज्यशासन आर्थिक  मदत करेल असा प्रस्ताव विद्यापीठाने द्यावा, असेही ते म्हणाले. 
मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांसारखे दृष्ट नेते महाराष्ट्राला लाभले. त्यात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि समाजाच्या भल्याचे अनेक निर्णय घेतले त्यानंतर शाहू महाराजांनी अनेक निर्णय घेतले.  त्यामुळेच आपले राज्य अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. आपल्या जनतेला न्याय दिला, त्यानंतर शाहु महाराजांनी जी विविध कामे केली त्यामुळे  छत्रपती शाहु महाराज म्हणजे एक दृष्टा राजा कसा असू शकतो याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. त्यांनी समाज सुधारणचे अद्वितीय काम केले आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाची गरज त्यांनी शंभर वर्षापूर्वी ओळखली होती आणि म्हणूनच सुदृढ समाज निर्मितीसाठी प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे हे आता सगळ्यांना कळाले आहे. जातीव्यवस्था व भेदाभेदाने 
विखुरलेल्या या समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विविध ठिकाणी शाळा, वस्तीगृहे सुरु केले. शिष्यवृत्या देण्यासाठी संस्थांनाचा खजिना उघडा केला. आधुनिक समाज घडविण्याचे काम त्यांनी केले. आरक्षण धोरणाचा दूरदर्शी आणि धाडसी निर्णय घेऊन कमजोर  घटकांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवून खर्‍या अर्थाने समानतेचे बिजं त्यांनी रोवली.  डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना मदत करुन वचिंतासाठी मंच तयार करण्याची प्रेरणा दिली. डॉ. आंबेडकरांनी समतेचे बिजरोपण संविधानात केले पण या विचारांचे बिजरोपण छत्रपती शाहू महाराजांनी केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की,  आंतरजातीय विवाह आपल्या स्व:तच्या घरात सुरु करुन जातीभेदाला मुठमाती देण्याचा आदर्श शाहुंनी घालून दिला. स्त्रियांना समान अधिकार, स्त्री पुरुष भेदभावरहित समाजच पुढे जाऊ शकतो,  असे त्यांनी सांगितले. पुढारलेल्या देशात स्त्री पुरुष मनुष्यबळाचा ज्या देशांनी उपयोग केला तीच राष्ट्रे पुढे गेली, त्यामुळे आपल्या राज्यात स्त्री - पुरुष भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, म्हणून  छत्रपती. शाहु महाराजांचे विचार आपण समजून घेतले पाहिजेत. विकासाची सर्वांगिण दूरदृष्टी बाळगणार्‍या या महामानवाचा पुतळा विद्यापीठामध्ये उभा राहिला आहे. तो केवळ जंयती व पुण्यतिथीच्या निमित्ताने फुले वाहण्यासाठी नसून त्यांच्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन तसे काम केले पाहिजे. यासाठी महाराजांच्या कार्याची माहिती एका दृष्टीक्षेपात विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून विद्यापीठाने एक हॅन्डबूक तयार करुन विद्यार्थांना त्याचे वाटप करावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पालकमंत्री श्री. बापट म्हणाले की,  या विद्यापीठात छत्रपती शाहु महाराजांच्या पुतळ्यामुळे  आम्हांला महाराजांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल. विद्यापीठात अनेक भागातून विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी वस्तीगृहातील जागा कमी पडते. महानगरपालिकेने वस्तीगृहासाठी जादा एफएसआय मंजूर केला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिंनीना या विद्यापीठातून शिक्षण द्यावे. त्यांना शैक्षणिक व वस्तीगृहाची सुविधा मिळावी यासाठी आपण प्रयत्न करु, असेही श्री. बापट म्हणाले.श्रीमंत शाहु महाराज म्हणाले की, महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व औद्योगिक अशा विविध  प्रकारचे कार्य उल्लेखनीय असून ते कदापि विसरता येणार नाही. शिक्षणाची गरज आजही मोठी आहे. तथापि, त्यात गुणात्मक बदल होणे गरजेचे असून त्यामुळेच आर्थिक प्रगती होईल. पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुलेंचे नाव दिले ही चांगली गोष्ट असून स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त अधिकार असले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर समारंभाची सुरुवात विद्यापीठगीताने झाली. यावेळी ई-कंटेन्ट डेव्हलपमेंट ण्ड लर्निग वेबपोर्टलचे  उद्घाटन, तसेच छत्रपती शाहु महाराजाच्या पुतळ्याचे मुर्तीकार एस. व्ही. परदेशी यांचा सत्कारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.