Breaking News

ग्रंथ समाज निर्मितीबरोबर मनोरंजनाचे काम करतात: मधुकर नेने

सातारा, 31 -  ग्रंथ हे विचार देण्याचे विचार निर्मितीचे आणि विचार करायला लावण्याचे काम करतात. ग्रंथ समाज निर्मितीचे काम करतात, मनोरंजनाचे काम करतात आणि समाज परिवर्तनाचेही काम करतात एकाअर्थी पुस्तक हे समाजाचे मस्तक असते, असे विचार मधुकर नेने यांनी आज व्यक्त केले.
सातारा येथील अजिंक्य सांस्कृतिक भवन, अजिंक्य कॉलनी, सदरबजार येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवात  ग्रंथांनी मला काय दिले या विषयावर परिसवांदात अध्यक्षीय भाषणात श्री. नेने बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी  धरमसिंग वळवी, प्रा.अनिल बोधे, ज्ञानेश्‍वर शेंडे, कवी लक्ष्मीकांत रांजणे, ग्रंथपाल नंदा जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
आपण जर ग्रंथांवर प्रेम केले तर जीवन समृद्ध होईल, असे सांगून  श्री. नेने पुढे म्हणाले, ग्रंथांना आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व असून आपल्या जीवनात ग्रंथ महत्वाचे स्थान बजावू शकतात. जो ग्रंथ मिळेल तो मी घेतो. माझं घर हे पुस्तकालय झाले आहे. पुस्तके हे सर्व प्रकारचा आस्वाद देतात, असेही ते शेवटी म्हणाले.
  ग्रंथांमध्ये समाज परिवर्तन घडविण्याची ताकद असल्याचे सांगून लक्ष्मीकांत रांजणे पुढे म्हणाले, ग्रंथातील विचारांचा परिणाम हा समाजावर होत असतो. ग्रंथ हे आयुष्यात उभं राहण्यासाठी शिकवतात. ग्रंथ हे आपल्याशी अप्रत्यक्षपणे संवाद साधण्याचे काम करतात. प्रत्येक व्यक्तीने ग्रंथांचे वाचन केले पाहिजे कारण ग्रंथ जगण्याची जिद्द, उर्मी, शक्ती देण्याचे काम करतात. आपण जर ग्रंथांच्या सहवासात गेलो तर ग्रंथ आपल्या चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. ग्रंथ हे कित्येक वर्ष मागे व पुढे नेतात. अनेक प्रश्‍नांची उत्तरेही ग्रथांतूनच मिळतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने ग्रंथ वाचले पाहिजेत, असेही ते शेवटी म्हणाले. 
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, काळ हा कुणासाठी थांबत नसतो. मला साहित्याची आवड ही घरापासून मिळाली. ग्रंथ, पुस्तकँ, मासिके हे निखळ मनोरंजनाबरोबर विचारांचे मंथन करायला लावतात. अशा या ग्रंथांमधून संस्कार मिळतात. माझ्या महाविद्यालयीन काळात मी अनेक पुस्तकँ वाचली.   ग्रंथ हे चिंतन, मनन व  विचार करायला लावतात. याच ग्रंथांनी  मला वाचकापासून लेखक बनवलं. ग्रंथांनी जगण्याची उर्जा आणि उर्मी दिली. त्यामुळे आयुष्यात ग्रंथ सोडून दुसरा गुरु करावा लागला नाही. 
प्रा. अनिल बोधे म्हणाले, जगामध्ये ग्रंथ संपदा मोठ्या प्रमाणात आहे. कॉलेजच्या जीवना मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तक आणि माझ्यात  एक प्रकारची नाळ तयार झाली आहे. ग्रंथांमुळे विविध प्रकारची पुस्तक वाचण्याची सवय लागली असून ते मला जगण्याचा आनंद देतात. ग्रंथांमध्ये मोठी ताकद असून माणूस घडविण्याचे कामही करतात. ज्यांच्या आयुष्यात ग्रंथ येतात तो भाग्यवंत आहे, असेही ते शेवटी म्हणाले.