Breaking News

सातारा स्वाभिमान दिनी उद्या अजिंक्यतारा किल्ल्यावर कार्यक्रम


सातारा, 11 - येथील शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व दुर्ग संमेलन संयोजन समितीच्या वतीने मंगळवार, दि. 12 रोजी किल्ले अजिंक्यतारा येथे ’सातारा स्वाभिमान दिवसा’चे आयोजन केले आहे. सातार्‍यासाठी अत्यंत पवित्र असलेल्या या दिनी प्रत्येक सातारकराने सकाळी 8 ते 10 यावेळेत राजसदरेवर येऊन अभिवादन करावे, असे आवाहन संयोजक दीपक प्रभावळकर व सुदाम गायकवाड यांनी केले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अजिंक्यतार्‍याच्या मुख्य महाद्वाराला तोरण बांधणे, ध्वजपूजन, अभिवादन असे विविध उपक्रम होणार आहेत.
सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराजाची चौथी आणि शेवटची राजधानी. अतिशय कडवा स्वाभिमान बाळगणारे आणि आपल्या अपूर्व अशा बलिदानाने मराठेशाहीच्या इतिहासात अजरामर झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती शाहू महाराज यांना किल्ले अजिंक्यतार्‍यावर दि. 12 जानेवारी 1708 रोजी मंचकारोहण झाले आणि खर्‍या अर्थाने सातारा ही मराठ्यांची राजधानी झाली. हाच दिवस सातारकरांचा ’स्वाभिमान दिवस’ म्हणून साजरा करण्याचे प्रयोजन तीन वर्षांपूर्वी येथील शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व दुर्ग संमेलन संयोजन समितीच्या वतीने ठरविण्यात आले.
यंदा याच किल्ले अजिंक्यतारा अर्थात राजधानी सातारा येथे होणार्‍या कार्यक्रमातंर्गत मूळ सातारकर असलेले व ज्यांनी शाहू काळापासून अजिंक्यतारा व राजधानी सातार्‍यासाठी आपले योगदान दिले आहे. अशा घराण्यातील सध्याच्या वंशजांच्या उपस्थितीत किल्ले अजिंक्यतार्‍यावर तत्कालीन राजसदरेवर अभिवादन करण्यात येणार आहे. 
ज्या राजसदरेवरून अटकेपार झेंडा लावण्याचे आदेश छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या फौजांना दिले, ती राजसदर पुन्हा एकदा सनई चौघड्यांचे आवाजात त्या काळातील आठवणी जागवणार आहे. यावेळी प्रा. संभाजीराव पाटणे यांचे ’छत्रपती शाहूंची राजसदर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.