जिद्द व चिकाटीच्या जोरावर महिला यशस्वी उद्योजिका होऊ शकतात ः जगताप
अहमदनगर । प्रतिनिधी । 25 - महिला चूल व मुलच्या पलीकडे जाऊन अनेक क्षेत्रात नांवलौकिक मिळवत आहे. गृहीणीच्या अंगी चिकाटी, जिद्द व नियोजन हे गुण असल्याने महिला एक यशस्वी उद्योजिका होऊ शकते. महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वत:चा उत्कर्ष साधण्याचा व महिलांना घरच्यांनी प्रोत्साहन देण्याचे आवाहन नगरसेविका शितल जगताप यांनी केले.
मैत्रेय महिला बचत गटाच्या वतीने बचत गट महिलांचा उद्योजिका मेळावा व्हिजन 2016 च्या उद्घाटना प्रसंगी सौ.शितल जगताप बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा निर्मलाताई मालपाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर गितांजली काळे, प्रकल्प प्रमुख तथा सचिव मंजुश्री बिहाणी, अध्यक्षा सौ.रुपाली बंग, महानंदाचे संचालक दर्शन सोनी, अनिता सोनी, कुबेर मार्केटचे संचालक प्रसाद पतके, मंजू पतके व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रकल्प प्रमुख मंजुश्री बिहाणी म्हणाल्या की, बचत गटातील उद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्य पदार्थांना बाजरपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरण हे या प्रदर्शना मागचा खरा उद्दीष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत मंजुश्री बिहाणी व रुपाली बंग यांनी केले. बचत गटाच्या वतीने पर्यावरण रक्षणा करिता वृक्ष संवर्धनाचा संदेश देत पाहुण्यांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले.
निर्मलाताई मालपाणी म्हणाल्या की, यशस्वीनी अभियानाच्या वतीने खा.सुप्रिया सुळे यांनी महिला बचत गटाची मोठी चळवळ उभी केली. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमिकरणास मुर्त स्वरुप आले आहे. शिक्षणाचा दर्जा, राहणीमान व जीवनमान बदलले आहे. या बदलत्या काळाबरोबर महिला उंबरठा ओलांडून आपले कार्य कर्तुत्व सिध्द करत असल्याचे सागून, उपस्थित महिलांना बचत गटाच्या कार्याची माहिती दिली. गितांजली काळे यांनी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्याचे सांगून, मैत्रेय ग्रुपच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
सारस नगर दत्त मंदिर परिसरात भरवण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या व्हिजन 2016 प्रदर्शनात ज्वेलरी, सौदर्य प्रसाधने, साडी, हस्तकलेचे साहित्य, रेडीमेड ड्रेसच्या विविध स्टॉलसह सोबतीला विविध खाद्य पदार्थांची मेजवाणी उपलब्ध करण्यात आली आहे. दोन दिवसीय प्रदर्शनात लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या भाग्यवंताना 2 हजार रुपये पर्यंतचे बक्षिस दिले जाणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी .राजकमल मनियार, संगीता कचोलिया, लता भुतडा, शारदा बिहाणी, अलका कालाणी, संपत गट्टाणी, संगीता बंग, सुशिला बिहाणी, सीमा बंग, स्वाती नागौरी, शितल नागौरी, सीमा ओझा, सुमित्रा गट्टाणी, अलका कालाणी, अनुराधा बंग आदी मैत्रेय ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.