दोन मद्यपी शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
अहमदनगर । प्रतिनिधी । 30 - शाळेच्या वेळेत मद्यपान करून शाळेत उपस्थित असणार्या दोन प्राथमिक शिक्षकांना स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गट शिक्षणाधिकारी यांनी रंगेहात पकडले होते. या शिक्षकांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांनी मद्यपान केल्याचे सिध्द झाल्याने या दोघा शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार राहाता तालुक्यातील निमगाववाडी येथील शिक्षक विलास शिंदे आणि शेवगाव तालुक्यातील कांबी येथील शिक्षक राजेंद्र रावळे शालेय वेळात मद्यपान करून शाळेत आढळून आले.
या दोन्ही शिक्षकांना त्या ठिकाणी असणार्या गट शिक्षणाधिकारी, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी पकडून त्यांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत त्यांनी मद्यपान केल्याचे सिध्द झाले. हा प्रकार गत आठवड्यात घडला होता. या शिक्षकांचा अहवाल तयार करून तो मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांना पाठवण्यात आला होता. अहवालाचा आधार घेत नवाल यांनी बुधवारी या शिक्षकांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केल्या आहेत.
ऐन शिक्षक बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत नवाल यांनी शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. निवडणूक काळात गैरवर्तन करणार्या शिक्षकांवर अशाच पध्दतीने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिला आहे.