Breaking News

स्पर्धा असल्याशिवाय कोणीही घडू शकत नाही - । आ.जगताप

 अहमदनगर । प्रतिनिधी । 30 -  नगरमध्ये वेळोवेळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते, ही खर्‍या अर्थाने चांगली बाब आहे. यामुळे पहिलवानांना चांगली संधी मिळते. स्पर्धा असल्याशिवाय कोणीही घडू शकत नाही. स्पर्धेमुळे प्रोत्साहन मिळते. पै. ओंकार घोलप, पै. विष्णू खोसे व पै. अतुल कावळे यांनी मेहनत व सातत्याच्या बळावर कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले आहे. नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विष्णू खोसे व अतुल कावळे यांनी चांगले यश संपादन केले. याचा नगरकरांना विशेष अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नगर जिल्हा कुमार चषक स्पर्धेतील विजेता ओंकार घोलप, मैदानी कुस्ती स्पर्धेतील विजेता विष्णू खोसे व अतुल कावळे यांचे आमदार संग्राम जगताप यांनी अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी आ. जगताप बोलत होते. याप्रसंगी शिर्डीचे उपनगराध्यक्ष नीलेश कोते, सनी विधाते, भरत पवार, मोहन गुंजाळ, संतोष ढाकणे, अजय घोलप आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, नगरमध्ये विविध तालीम असून, त्या माध्यमातून पहिलवानांना घडविण्याचे काम केले जाते. आतापर्यंत राज्यस्तरीय स्पर्धांत येथील पहिलवानांनी सहभागी होऊन चांगले यश संपादन केले आहे. नगर जिल्ह्याचा कुस्ती क्षेत्रात चांगला दबदबा आहे, असे ते म्हणाले.
नीलेश कोते म्हणाले की, घोलप, खोसे व कावळे यांनी मिळविलेले यश युवा पहिलवानांना प्रेरणा देणारे आहे. खेळाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने खेळाचा आनंद जोपासला पाहिजे. क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास मोठा वाव आहे. त्या दृष्टीने युवकांनी खेळाकडे पाहायला हवे, असे ते म्हणाले.