Breaking News

शनिच्या चौथर्‍यावर महिलांना बंदीच- महिला अध्यक्ष ठाम


अहमदनगर, 11 - शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्षपद महिलेला मिळाले खरे, पण त्यानंतरही महिलांना 
समानतेची वागणूक मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. कारण अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर अनिता शेटे यांनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळणार नाही, अशी आश्‍चर्यकारक भूमिका घेतली आहे. 
आम्ही महिलांना चौथर्‍यावर प्रवेश घेऊच देणार नाही, अशी भूमिका शेटे यांनी घेतली आहे.
जर अध्यक्षपदी
महिला चालते, तर दर्शनासाठी महिला का चालत नाही, असा प्रश्‍न विचारला असता, पूर्वापारपासून नीदेवावर 
महिलेची सावलीही पडता कामा नये, असे म्हटले जात असल्यामुळे चौथर्‍यावर प्रवेश दिला जाणार नाही, असे 
अनिता शेटे यांनी सांगितले आहे. गेल्या महिन्यात एका तरुणीने अचानकपणे चौथर्‍यावर जाऊन शनी महाराजांचें दर्शन घेतले. ही बाब सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली. यानंतर मोठा गदारोळ झाला. दुसरीकडे याच निमित्ताने पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना शनी मंदिर प्रवेशाची मोहीम सुरु झाली. त्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत दोन महिला निवडून आल्या. पण अनिता शेटेंनी आता चौथरा प्रवेश नाकारुन पुन्हा यू टर्न घेतल्याने त्या फक्त नामधारी आहेत का? असे प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत.