सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे कार्य महत्वपुर्ण - डॉ. दांगट
औरंगाबाद, 9 - प्रशिक्षण हे शिक्षणाच्या एक पाऊल पुढे असते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य वृध्दींगत होण्यास मदत होते असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी केले. येथील मराठवाडा महसुल प्रशिक्षण प्रबोधिनीत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्यावतीने आयोजित घ्गोदाम व्यवस्थापन’ विषयक कार्यशाळेत श्री. दांगट बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटक माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे, अपर आयुक्त किसनराव लवांडे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त डॉ. विजय कुमार फड, पारस बोथरा, आदींची यावेळी उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त दांगट म्हणाले की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या मुलभूत गरजांपैकी अन्न ही गरज भागविली जाते. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातील 14 जिल्हयात गेल्या ऑगस्टपासून अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर केशरी कार्डधारक शेतकर्यांना अत्यंत अल्पदरात धान्य पुरवले जात आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणे महत्वाचे असल्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस तांत्रिक बाबीमध्ये प्रगती होत असल्याने वितरण व्यवस्थेत देखील जीपीएस सिस्टीम, गुप एसएमएस, बायोमेट्रिक, शिधापरिका धारकाच्या याद्यां, संगणकीकरण व आधारकार्डांशी सांगड या मुळे वितरणात पारदर्शकता येण्यास मदत होत आहे. पुरवठा विभागात काम करताना अधिक जागरुक व सावधतेने काम करणे गरजेचे या विभागाची प्रतिमा सुधारण्याची गरज आहे.
उद्घाटक म्हणून बोलताना भोगे म्हणाले की, पुरवठा विभागात काम करताना कायदे, नियम, धोरण इत्यादीची परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. गोदाम तपासणी अत्यंत काळजीपुर्वक, नियमावलीच्या आधारे व अत्यंत पारदर्शकपणे करावी. तसेच गोदामात त्रुटी असल्यास प्रशासनाकडे त्यांचा पाठपुरावा करावा. अधिकार्यांनी पाच वर्षाचा मास्टरप्लान तयार करुन त्या प्रमाणे काम केल्यास कामाला न्याय मिळेल. या कार्यशाळेत पुरवठा विभागाकडून अपेक्षा, कर्तव्य व जबाबदार्या, गोदाम व्यवस्थापन, पुरवठा विषयक तपासण्यांचे महत्व, तहसिल कार्यालय व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संबंधित विविध अहवाल, ताळमेळ, पुरवठा विषयक कायदेशीर तरतुदी व धान्याचे आगीपासून संरक्षण व उपाय योजना या विषयांवर मागदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला विभागातील जिल्हा पुरवठा अधिकारी, निरीक्षण अधिकारी, जिल्हा लेखा पर्यवेक्षक, गोदामपाल व अव्वल कारकून मोठ्या संख्येने उपस्थित होते.