Breaking News

दलित विरोधी पोलिसींगचा तीव्र निषेध -- सर्वपक्षीय कृती समितीच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद

 कुमार कडलग/नाशिक। 23 -  दलित अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून न्यायाचा हक्क मागण्यासाठी संघर्ष करणार्‍या दलित समाजातील तरुणांसह  प्रौढ कार्यकर्त्यांंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन करीत आहेत. दलीत विरोधी पोलिसींगचा तीव्र निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काढलेल्या मोर्चाला भरभरून प्रतिसाद लाभला. दलीत समाज आपल्या भावना या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांच्या कानावर टाकल्या.
या संदर्भात अधिक माहिती देताना प्रवक्त्याने सांगितले की, सामाजिक चळवळीत काम करणार्‍या दलित कार्यकर्त्यांना पोलिसांकडून गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे. एखाद्या सामाजिक प्रश्‍नावर आवाज उठविला तर त्याला न्याय देण्याऐवजी त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे प्रकार नाशिकमध्ये सर्रास सुरू आहेत. गेल्या वर्षभरात अशा अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांच्या सामाजिक चळवळीच्या मुलभूत अधिकारावरच हल्ला केला असल्याचा आरोप या प्रवक्त्याने केला. 
दलित समाजाच नव्हे तर प्रत्येक समाजात प्रामाणिकपणे काम करणारा चळवळीचा कार्यकर्त्या हा राज्य घटनेला मानणारा वर्ग आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता चळवळीतला कार्यकर्ता घटनेला सहसा आव्हान देत नाही. मात्र पोलिस चळवळीचा अधिकारच खोट्या गुन्ह्यांचा धाक दाखवून नाकारू लागले आहेत असाही आरोप या प्रवक्त्याने केला.  या संदर्भात या प्रवक्त्याने उदाहरणादाखल काही घटनाही नमूद केल्या. 
काट्यामारुती पोलिस चौकीतील हल्ला - 
पंचवटी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत काट्या मारुती पोलिस चौकीत जितु साबळे नामक एका तरुणावर पोलिसांसमोर हल्ला झाला. वाद झालेल्या दोन गटांना पोलिसांनी तडजोडीसाठी पोलिस चौकीत बोलावले होते. यावेळी पोलिसांसमोरच या तरुणावर हल्ला झाला तरीही पोलिसांनी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनाच लक्ष्य केले. 
संजय साबळे - 
भारतनगर प्रकरणात संजय साबळे यांना गोवण्यात आले आहे. वास्तविक या प्रकरणाशी थेट संजय साबळे यांचा संबंध नाही. या प्रकरणाशी फिलोमिना साबळे, आकाश साबळे ही मंडळी दोषी असतीलही मात्र संजय साबळे यांना गोवण्यामागे काट्यामारुती पोलिस चौकीत घडलेल्या घटनेचा सुड उगवणे हाच पोलिसांचा हेतू आहे. जितू साबळे हल्ला प्रकरणात संजय साबळे यांनी पोलिस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्याविरुद्ध मोहीम उघडली होती. नाईलाजास्तव का होईना आयुक्तांना त्यांची बदली करावी लागली. त्याचा सुड म्हणून त्यांना गोवले गेले, असा युक्तीवाद या प्रवक्त्याने साबळे प्रकरणासंदर्भात केला. 
मंगेश मोरे - 
हा दलित चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेजारी एक घटना घडली. एका महिलेला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले गेले.या महिलेवर त्वरित उपचार झाले नाही म्हणून मंगेश मोरेने डॉक्टरांना जाब विचारला हीच मंगेश मोरेची चुक. आपलं माणूस गेल्यानंतर नातेवाईकांनी संतप्त भावनेतून बिटको रुग्णालयात तोडफोड केली. या तोडफोडीशी मंगेश मोरेचा थेट कुठलाही संबंध नसताना त्याला या प्रकरणात अडकवण्यात आले. 
शशिकांत उन्हवणे - 
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ दलित समाजच नव्हे तर कुठल्याही समाजावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धावून जाणारं व्यक्तीमत्व म्हणून शशि उन्हवणे हे ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी राजीवनगर झोपडपट्टी उठवण्याचा कार्यक्रम मनपाने आखला, तेव्हा शशि उन्हवणे यांनी या झोपडपट्टी वासियांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या नंतरच झोपडपट्टी उठवा अशी मागणी करत मध्यस्थी केली. आयुक्त डॉ.गेडाम यांनीही उन्हवणे यांची ती मागणी त्या क्षणी मान्य केली आणि दुसर्‍या दिवशी या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवला. अचानक आपल्या संसारावर नांगर फिरवला जात असल्याचे पाहून झोपडपट्टीधारकांचा संयम सुटला आणि त्यांनी विरोध केला. यावेळी झालेल्या नुकसानीला, कायदा व्यवस्थेला शशी उन्हवणे यांना जबाबदार धरण्यात आले.
अशाप्रकारे अनेक घटनांमध्ये प्रत्यक्ष संबंध नसताना शिष्टाई करणार्‍या दलित समाजाच्या नेत्यांनाच टार्गेट करून नेतृत्व संपविण्याचा सपाटा पोलिस प्रशासन करीत आहे, त्याचा निषेध नोंदविण्यासाठी सर्वपक्षीय दलित कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दलित अत्याचार विरोधी कृती समिती आणि भिमप्रतिज्ञा समता संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. नागरिकांनीही या मोर्चाला मोठा प्रतिसाद दिला.