Breaking News

कॅन्सरग्रस्तांना ब्रॅकी थेरपीचा दिलासा

 नाशिक/प्रतिनिधी। 23 -  मुंबईचे टाटा मेमोरिअल हॉस्पीटल नागपूर औरंगाबाद नंतर नाशिकच्या नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस.जी.एस. कॅन्सर हॉस्पिटलने कॅन्सरग्रस्त रूग्णांना मानसिक शारिरीक आणि आर्थिक दिलासा देणारी ब्रॅकी थेरिपी सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी दिली. कॅन्सरच्या उपचारात केमोथेरेपी, रेडिओ थेरिपी यांसारखे वेदनायुक्त आणि आर्थिकदृष्ट्या महागडे उपचार अपरिहार्य आहेत. हे खरे असले तरी नामको चॅरिटेबल ट्रस्टने ब्रॅकी थेरिपीसारखी सुविधा उत्तर महाराष्ट्रातील रूग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
ब्रेकीथेरीपी म्हणजे स्पेसिफीक रेडीएशन थेरपी विशिष्ट भागातच म्हणजे नाजुक अशा कॅन्सर गाठेला लाईट देणे. थेट गाठीला नाजूक तार किंवा वायर टाकून ही लाईट दिली जाते अन्य लाईट देण्याच्या पारंपारिक पध्दतीपेक्षा ही पध्दत अल्पखर्चिक, वेदनामुक्त असल्यामुळे रुग्णास होणारा त्रास कमी होतो शिवाय खर्चही वाचतो असा दावा ट्रस्टने केला आहे. 
या पध्दतीने गाठीचा आकार कमी होतो. वेदना बंद होते आणि नंतर शस्त्रक्रिया करून गाठ काढणे सहज सुलभ होते. अशा प्रकारची सुविधा टाटा मेमोरिअल नंतर नागपूर आणि औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी नामको ट्रस्टने ही सुविधा उपलब्ध केली असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगितले जाते. 
या थेरपीसाठी 12 ते 15 हजाराचा खर्च येत असला तरी नामको ट्रस्ट 7 ते 10 हजारात या थेरपीचा उपचार रुग्णांना देते. या थेरपीचा समावेश राजीव गांधी आरोग्यदायी योजनेतही करण्यात आला आहे. प्रोस्टेट कॅन्सर, स्तन कॅन्सर, गुरदार कॅन्सर, सारकोमा, मानेचा, डोक्याचा कॅन्सर अशा सर्व प्रकारच्या रुग्णांवर या थेरपीने उपचार शक्य असल्याचे मत कॅन्सर किरणोपचार केमोथेरपी तज्ञ डॉ. श्रीकांत खरे, डॉ. मुकेश चंद्रा, कॅन्सर सर्जन, डॉ. विनायक शेणगे, भुलतज्ञ  डॉ. हेमंत डंवाळे, डॉ. पाठक यांनी नोंदविले.
फेब्रुवारी महिन्यात नामको चॅरिटेबल संचलित एसजीएस कॅन्सर हॉस्पीटल लिनायक रेडिएशन थेरेपी (टेली थेरपी)देखील सुरू करण्यात येणार असून या थेरपी कुठल्याही किरणोत्सारी मुलद्रव्य वापरली जात नाही. यात रूग्णाला लागेल एवढीच एनर्जी या थेरेपीत तयार होत असते. की ही थेरपी पुर्णत: कॉप्युटराईज प्रोग्रामवर अवलंबून आहे. एनर्जी तयार होवून ती कुठेही स्प्रेड होत नसल्याने या थेरपीने कुठलाही साइड इफेक्ट होत नाही. की ही सुविधा रूग्णांना उपलब्ध होण्यासाठी ट्रस्ट कडून युएसए येथून सहा कोटी रूपयांचे मशिन मागविण्यात आले आहे. ही थेरपी महागडी असली तरी फायदा अधिक आहे. असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
उत्तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत कॅन्सर हॉस्पीटलमध्ये ब्रॅकी थेरपीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे तथापि या थेरपीसाठी लागणारी कॅप्सुल (आर. आर. 192 रेडिओ अ‍ॅक्टिव्ह एलिमेंट)अत्यंत महागडी असून ही कॅप्सुल नेदरलँड वरून मागविली जाते. तिचे आयुष्यात केवळ 6 महिने इतकेच असल्याने वापरण्याच्या भानगडीत खाजगी कॅन्सर तज्ञ पडत नाहीत.