सांगलीत व्यापारी एकता असोसिएशनची स्थापना
सांगली, 24 - महापालिका क्षेत्रातील सर्व संघटित व असंघटित व्यापार्यांना एकत्र आणून त्यांच्या हितरक्षणासाठी व्यापारी एकता असोसिएशन ही संघटना स्थापन केल्याची माहिती अध्यक्ष समीर शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, महापालिका एलबीटी हटाओ कृती समितीने एलबीटी हटवण्यासाठी सांगलीपासून राज्यापर्यंत लढा दिला. त्यामुळे विनापर्याय एलबीटी हटली. त्यामध्ये समितीचा मोठा वाटा आहे. समितीने आता व्यापारी संघटन करण्यासाठी नवीन संघटनेची स्थापना करण्याचा संकल्प केला. त्यातून व्यापारी एकता असोसिएशनची स्थापना केली. सर्व संघटित व असंघटित व्यापार्यांना एकत्र आणून त्यांचे हितरक्षणासाठी मजबूत व पारदर्शक संघटना करणे, या यामागचा उद्देश आहे. महापालिका क्षेत्रात 14 हजार व्यापारी व उद्योजक आहेत. त्यापैकी 800 ते 900 जण संघटित आहेत. इतर सर्वजण असुरक्षित आहेत.शहा म्हणाले, व्यापार्यांची संघटना राज्य व देश पातळीवर मजबूत संघटनेशी संलग्न राहील. व्यापार हा उद्देश व हेतू न ठेवता व्यापार्यांच्या प्रश्नासाठी संघटना कार्यरत राहील. व्यापार्यांना संरक्षण देण्याबरोबर वकील, कर सल्लागार यांचे पॅनेल कार्यरत ठेवले जाईल. आतापर्यंत 8 हजार व्यापार्यांपर्यंत पोहोचून सदस्यत्व नोंदणी फॉर्म दिला आहे. इतरांनी देखील संघटनेशी संपर्क साधावा. संघटनेचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला जाईल. उपाध्यक्ष सुरेश पटेल, सचिव सोनेश बाफना, धीरेन शहा, खजिनदार सुदर्शन माने, संचालक मुकेश चावला उपस्थित होते.