महापौरपदाबाबत राष्ट्रवादीची उद्या बैठक
सांगली, 24 - काँग्रेस नेत्यांनी उपदेशाचे डोस दिल्यानंतरही, महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांनी लॉबिंग सुरूच ठेवले आहे. इच्छुकांनी आ. पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांची भेटघेऊन शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर निवडीच्या मैदानात उतरण्याची तयारी चालविली असून सोमवार 25 रोजी राष्ट्रवादीची बैठक होत आहे. महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. तोपर्यंत उमेदवारीसाठी कुरघोड्यांचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
महापौर पदासाठी काँग्रेस नगरसेवकांकडून लॉबिंग केले जात आहे. नगरसेवकांच्या गाठीभेटीपासून ते घोडेबाजारापर्यंत सर्व पर्याय वापरले जात आहेत. त्यात गेल्या दोन महिन्यापासून काँग्रेस नगरसेवकांत फाटाफुट झाली होती. त्यात इच्छुकांची संख्या वाढल्याने नगरसेवकांच्या आशा उंचावल्या होत्या. इच्छुकांनीही नगरसेवकांना आमिषे दाखवित आपल्याकडे खेचण्यास सुरूवात केली होती.
त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम, महापालिकेच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीत पतंगरावांनी नगरसेवकांना उपदेशाचे डोस पाजले. महापौर पदासाठी लॉबिंग, सह्यांची मोहीम आखून फायदा होणार नाही. जयश्रीताई जो निर्णय घेतील, तोच महापौर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पण पतंगरावांच्या या इशार्यानंतरही इच्छुकांच्या हालचाली थांबलेल्या नाहीत. उमेदवारी मिळविण्यासाठी कुरघोड्या सुरूच आहेत. शुक्रवारी विजय घाडगे यांनी जयश्रीताई पाटील व पतंगराव कदम यांची भेटघेऊन शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. सुरेश आवटी सर्मथक गटानेही जयश्रीताईंची भेटघेतली. उपमहापौर प्रशांत पाटील यांनी मुदतवाढीसाठी जयश्रीताईंना साकडे घातले. पुढील आठवड्यात महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर पुन्हा काँग्रेस नगरसेवकांची बैठक होणार आहे. या बैठकीची तयारी इच्छुकांनी सुरू केली आहे.
महापौर पदाच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही चालविली आहे. राष्ट्रवादीकडूनही उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी त्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. येत्या रोजी जयंतरावांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक होत आहे. या बैठकीत उमेदवारीबाबत निर्णय अपेक्षित आहे.
गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील व मदन पाटील यांचे सूत जुळलेले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात आला तरी, ते महापौरपद खेचून आणण्यासाठी फारसे प्रयत्न करण्याची शक्यता धुसर आहे. उलट काँग्रेसमधील महत्त्वाकांक्षी नगरसेवकांना चाप लावण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते करतील, अशीही चर्चा पालिका वतरुळात आहे.