Breaking News

राखेपासून वाचवा, दादांच्या पुतळ्यासमोर आंदोलन


सांगली, 24 - वसंतदादा, आम्हांला साखर कारखान्याच्या राखेपासून वाचवा, अशा घोषणा देत जिल्हा सुधार समितीने येथील स्टेशन चौकातील दादांच्या पुतळ्यासमोर पश्‍चाता आंदोलन केले. आंदोलनाच्या सुरुवातीलाच पुतळ्याभोवती पडलेली राख स्वच्छ करुन दादांनाच साकडे घालण्यात आले.
सुधार समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, अ‍ॅड. अमित शिंदे, मुनीर मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून वसंतदादा साखर कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणार्‍या राखेविरोधात आंदोलन हाती घेतले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादांच्या पुतळ्यासमोरच पश्‍चाताप आंदोलन केेले. ङ्गदादा, आम्हांला राखेपासून वाचवाफ, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
अ‍ॅड. शिंदे म्हणाले, वसंतदादांनी उभारलेला साखर कारखाना त्यांच्या वारसदारांनी मोडकळीस आणला आहे. आता कारखान्याच्या राखेमुळे सांगलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे, पण त्यांनी त्याबाबत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. या आंदोलनाची दखल घेऊन कारखान्याने राखेचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करु.
मुनीर मुल्ला म्हणाले की, कारखान्याच्या राखेमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कारखान्यामुळे शेतकरी, कामगार, सभासद कोणाचेच भले झालेले नाही. त्यामुळे वसंतदादांच्या सांगली नगरीत राहण्याचाही पश्‍चाताप होत आहे. 
अ‍ॅड. के. डी. शिंदे, जनार्धन गोंधळी, शशिकांत गायकवाड, महावीर पाटील यांनी आंदोलनात सहभागी होत पाठींबा दिला. यावेळी समितीचे शहराध्यक्ष प्रवीण शिंदे, अ‍ॅड. राजू यमगर, रामदास कोळी, रघुनाथ पाटील, आर. बी. शिंदे, शंकर माळी उपस्थित होते.