विमानतळांवर हल्ल्याच्या अफवा पसरवणार्यांना अटक
पुणे, 24 - मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळासह देशातील प्रमुख विमानतळांवर हल्ल्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणी काल पुणे-सोलापूर महामार्गावरुन संजय मिश्रा आणि सागर नकातेला हैदराबाद एक्स्प्रेसमधून अटक करण्यात आली.
35 वर्षीय संजय मिश्रा हा मूळचा पुण्याचा असून तो अॅनिमेटर म्हणून काम करतो. काल त्याने सुरुवातीला मुंबई-भुवनेश्वर विमानात बॉम्ब असल्याचे फोनवरुन सांगितले. त्यानंतर मिश्रानेच मुंबई विमानतळावरही हल्ला होणार असल्याचे सांगत सुरक्षा यंत्रणाना पळती भुई थोडी केली. दरम्यान, दादर स्टेशन उडवून देण्याची धमकी देणार्या सागर राजेंद्र नकाते या तरुणालाही रेल्वे पोलिसांनी पुण्याच्या खडकीतून अटक केली आहे. वडिलांच्या फोनवरुन कॉल करत सागर नकातेने मुंबईतले दादर स्टेशन उडवून देईन अशी धमकी दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी फोनचे लोकेशन स्ट्रेस करत सागर नकातेला अटक केली आहे.
काल दुपारी हैदराबाद एक्स्प्रेसमधून सागर नकाते प्रवास करत होता. पोलिसांनी ही गाडी थांबवत त्याला जनरलच्या डब्यातून ताब्यात घेतले. ज्या क्रमांकावरुन धमकीचा फोन सागरने केला होता, त्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर त्याचा डीपी होता. त्या फोटोवरुन पोलिसांना त्याची ओळख पटली आणि अटक करण्यात यश आले. सध्या रेल्वे पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.