Breaking News

मरेच्या पावसाळी अडचणी दूर होणार

मुंबई, प्रतिनिधी, दि. 31 - रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणात साचणार्‍या पाण्यामुळे मध्य रेल्वे प्रत्येक वर्षी विस्कळीत होत असते. यातून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून चार रोड ओव्हर ब्रीज आणि पादचारी पुलांवर (एफओबी) हातोडा चालवितानाच आणखी दोन रोड ओव्हर ब्रीजची (आरओबी) रुळांपासून उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 
यामुळे मध्य रेल्वेच्या रुळांवर पावसाळ्यात पाणी साचणार नाही, असा दावा रेल्वे अधिकार्‍यांकडून केला जात आहे. यात पहिला हातोडा हा कर्नाक पुलावर पडणार असल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेवर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे लोकल सेवेचा बोर्‍या वाजतो. यात काही पुलांच्या खांबांच्या अडथळ्यामुळे आणि त्या दरम्यानच असणार्‍या ट्रॅकची उंची कमी असल्याने पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्वात जुन्या आणि कमी उंची असलेल्या आरओबी तसेच पादचारी पुलांवर हातोडा चालवितानाच ते नव्याने बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे काही आरओबीची ट्रॅकपासूनच उंची वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले, की मस्जीदजवळील कर्नाक आरओबी, भायखळ्यातील चामरलेन पादचारी पूल, कुर्ल्याजवळील स्वदेशी मिल पादचारी पुल आणि घाटकोपर पंतनगरजवळील पादचारी पूल तोडण्यात येतील. त्याऐवजी नवीन आरओबी आणि पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांची उंची वाढवितानाच ट्रॅकही वर उचलले जातील. त्याचबरोबर करी रोड आरओबी आणि टिळक ब्रीजचीही ट्रॅकपासून उंची वाढविण्यात येईल. त्यामुळे या सर्व पुलांखाली रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून लोकल गाड्यांना लादण्यात आलेले ताशी 30 ते 50 वेगाचे बंधन हटेल. यासाठी कर्नाक पुलावर प्रथम हातोडा पडणार आहे. कर्नाक पूल पाडण्यासाठी त्यावरील वाहतूक बंद करण्यासंदर्भात अजून अधिसूचना आम्ही जारी केलेली नाही. कारण हँकॉक पूल पाडण्यात आल्याने तेथील वाहतूक वळवण्यात आली आहे. या पुलावरील वाहतुकीचा प्रश्‍न आहे. त्यामुळे कर्नाक पूल तोडायचा झाल्यास यावरील वाहतूक दुसरीकडून वळवावी लागेल आणि त्यासाठी मोठे नियोजन करावे लागणार आहे.