Breaking News

समान वीजदराबाबत कंपन्यांची नकारघंटा

मुंबई, प्रतिनिधी, दि. 30 - मुंबईत घरगुती ग्राहकांसाठी समान वीजदर ठेवण्यास काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत नकार देण्यात आला. टाटा, रिलायन्स, बेस्ट आणि महावितरण या कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.  समान वीजदरांसाठी मुंबईतील वीज कंपन्यांनी पुढाकार घेऊन सगळ्या ग्राहकांसाठी एकाच पातळीवर वीजदर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले. मुंबईतील वेगवेगळ्या वीजदरांबाबत रिलायन्स, बेस्ट आणि टाटा पॉवरच्या प्रतिनिधींना ऊर्जामंत्र्यांनी धारेवर धरले. 500 युनिटपर्यंत दर समान ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबत सुचवावे, असे कंपन्यांना सांगण्यात आले. 5 फेब्रुवारीला समान वीजदराच्या मुद्द्यावर सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे. तिन्ही कंपन्यांच्या वीजदरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यासोबतही बैठक होईल, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. 
मुंबई परिसरातील वीजपुरवठ्याविषयीच्या उपाययोजनांसाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. कंपन्यांचे अधिकारी आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या अधिकार्‍यांचा समितीत समावेश आहे. समितीने मुंबईत वीजपुरवठा करणार्‍या कंपन्यांचे वितरण आणि पारेषणासाठी उपयुक्त योजनांचा आढावा घेणे अपेक्षित आहे. मुंबईतील वीजनिर्मितीसाठी संचउभारणीची अडचण पाहता पारेषण व्यवस्था बळकट करणे अपेक्षित आहे. टाटा पॉवरचा तेलावर चालणारा संच क्रमांक 6 कोळशावर चालू करण्याचा निर्णय प्रलंबित आहे. मुंबईतील वीजमागणीचा अभ्यास करून उपकेंद्राच्या जागेचा शोध, जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर, भूमिगत उपकेंद्र यांसारख्या गोष्टींवर समितीकडून तातडीने निर्णय अपेक्षित आहे.