Breaking News

जिद्दीने शोधले मोबाइलवर डोळे तपासणीचे उपकरण, रुग्ण, नेत्रतज्ज्ञांसाठीही वरदान

मुंबई, प्रतिनिधी, दि. 30 - मोबाइलवर डोळे तपासता येणारे स्लीट लॅम्प अ‍ॅडॉप्टर विकसित केल्याचे वाचनात आले, पण ते मागवायचे म्हणजे खर्चिक आणि जिकिरीचे ठरत होते. 
त्यामुळे आपणच तसे उपकरण तयार करण्याच्या ईर्षेतून मुंबईतील 30 वर्षीय नेत्रशल्यचिकित्सक रोहित मोदी आणि त्यांच्या सहकारी प्रॉडक्ट डिझायनर अवनी तवोगिरी यांनी मेक इन इंडियाचा अनोखा प्रयोग साकारला. या क्षेत्रात महत्त्वाच्या ठरणार्‍या 8 ते 10 लाख किमतीच्या आणि केवळ महागड्या आयफोनवरच वापरता येणार्‍या स्लीट लॅम्प उपकरणाला अवघ्या 3 हजारांत पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. अ‍ॅडॉप्टर मोबाइलला जोडून डोळे तपासता येतील, डोळ्यांच्या आतील भागातील छायाचित्रेही काढता येतील. यामुळे नेत्रनिदान क्षेत्रात क्रांती घडून येईल, असा या चमूला विश्‍वास आहे. डॉ. मोदी व तवोगिरी यांनी विकसित केलेला ग्लोबल स्लीट लॅम्प अ‍ॅडॉप्टर ग्रामीण भागातील रुग्णांनाच नव्हे, तर डोळे तपासणीतील तंत्रज्ञ व नेत्रतज्ज्ञांनाही वरदान ठरणार आहे. सध्या किमान 50 हजारांच्या आयफोनवरच वापरता येईल असे किमान 7 हजार रुपये किमतीचे स्लीट उपकरण आयात करण्याखेरीज पर्याय नव्हता. परंतु या चमूने शोधलेला अ‍ॅडॉप्टर कोणत्याही अँड्रॉइड फोनवर वापरता येण्याजोगा आहे.
गरज ही शोधाची जननी....
अशा प्रकारचा अ‍ॅडॉप्टर कोणीतरी विकसित केल्याचे मी वाचले होते. नंतर त्याबाबत शोध घेतला, परंतु भारतात त्याविषयी माहिती मिळाली नाही. ऑनलाइन खरेदी करणे शक्य नव्हते. हे अ‍ॅडॉप्टर फक्त आयफोनवरच चालणारे असल्याने ते माझ्या फोनला कामी येण्याची शाश्‍वती नव्हती. मग आपणच ते का बनवू नये असा विचार आला. संकल्पना साकारण्यासाठी काम करणार्‍या वेव्ह’ संघटनेपुढे अँड्रॉइड फोन व नेत्रचिकित्सा उपकरणांनासाठी अ‍ॅडॉप्टर बनवण्याचा प्रस्ताव मी ठेवला. अनेक प्रयोगांनंतर तो साकारला, असे मत नेत्रशल्यचिकित्सक डॉ. रोहित मोदी यांनी व्यक्त केले आहे.