भाडे नियंत्रण कायद्यावरून शिवसेना-भाजपची खडाजंगी
मुंबई, प्रतिनिधी, दि. 30 - भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित सुधारणांवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे. मात्र मूळ भाडे नियंत्रक कायद्यात कोणताही बदल करणार नसल्याचं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. तसा विचारही सरकारनं केला नसल्याचा दावा मेहतांनी केला. त्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रकाश मेहतांवर टीका केली. मेहतांना भाजप आमदार आशिष शेलारांचा गुण लागला आहे, असं म्हणत रामदास कदमांनी मेहतांवर टीकास्त्र सोडलं आहे. प्रकाश मेहतांनी कायदा दुरुस्ती नाकारावी याचं आश्चर्य वाटतंय. ढवळ्या शेजारी बांधला पवळया, वाण नाही पण गुण लागला तसा मेहतांना आशिष शेलारांचा गुण लागला असावा, असं टीकास्त्र रामदास कदमांनी सोडलं
मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्यासाठी भाजपनं कायद्यात बदल करण्याचा घाट घातलाय, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून शिवसेना भाडे नियंत्रण कायद्याचं भांडवल करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे.