Breaking News

पारनेरमध्ये बालाआनंद मेळाव्यात समाजसेवक अण्णा हजारे रमले


 अहमदनगर । प्रतिनिधी । 04 - सामाजिक प्रश्‍नांवर राजकीय नेत्यांना धारेवर धरणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्याचे भविष्य असणार्‍या मुलांच्या प्रश्‍नांवरही तेव्हढेच जागरुक असतात, याचा प्रत्यय शनिवारी राळेगणसिद्धी येथे आयोजित बालआनंद मेळाव्यात उपस्थितांना आला. मुलांमध्ये रमलेले अण्णा पाहून उपस्थितांनाही फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
वाडेगव्हाण जि. प. गटातील 46 शाळेतील विद्यार्थ्यांच्या बाल आनंद मेळाव्यास राळेगणसिद्धीतील पद्मावती मंदिर परिसरात शनिवारी प्रारंभ झाला. हा मेळावा दोन दिवस चालणार असून, रविवारी या मेळाव्याचा समारोप होणार आहे. या मेळाव्यात मुलांनी रांगोळी, हस्तकला प्रदर्शन तसेच भाजीबाजार भरवून व्यवहार ज्ञानाचे कौशल्य आत्मसात केले. मुलांनी भरविलेल्या बाजारात फेरफटका मारीत अण्णांनी मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे ज्ञान पाहून अण्णांनीही मुलांचे कौतुक केले. 
जि. प. सदस्य विश्‍वनाथ कोरडे यांच्या प्रयत्नाने व पिंपरी चिंचवड रोटरी क्लब यांच्या वतीने गटातील अळकुटी, मावळेवाडी, गुणोरे, कुरुंद, बाभुळवाडे, सारोळे अडवाई, यादववाडी या प्राथमिक शाळांना व हिवरे कोरडा माध्यमिक विद्यालयाला संगणक, प्रोजेक्टर व सॉफ्टवेअर जेष्ठ समाजसेवक  अण्णा  हजारे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी  रोटरी क्लबचे अध्यक्ष संजीव  दाते, एम.  राधाकृष्णन, सभापती गणेश  शेळके,  गटशिक्षणाधिकारी  के. एल. पटारे,  राळेगणसिद्धीच्या  सरपंच  मंगल पठारे, उपसरपंच लाभेष औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी आदी उपस्थित होते.