Breaking News

डॉक्टरच्या चुकीमुळे शेतकर्‍याला गमवावा लागला पाय


पिंपरी (प्रतिनिधी), 13 - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शिरुर तालुक्यातील एका शेतकर्‍यावर एक पाय गमवण्याची वेळ ओढावली. या प्रकरणी एका शल्यचिकित्सकाला निलंबित करण्यात आले असून अन्य दोन डॉक्टरांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. कुटुंबप्रमुखाला कायमचे अपंगत्व आल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबाने संबंधित दोषी डॉक्टरांवर पोलीस कारवाई करण्याची तसेच नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
बाळासाहेब देडगे (वय 32) असे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उजवा पाय गमवायची वेळ आलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. पायाची नस ब्लॉक झाल्यामुळे त्यांना 14 सप्टेंबर 2015 रोजी उपचारासाठी पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात ब्लॉक झालेली नस खुली करणे अपेक्षीत होते. मात्र डॉक्टरांच्या गहाळ कारभारामुळे रुग्णाची पायाला रक्तपुरवठा करणारी मुख्य नस कापली गेली व संजीवनी देणार्‍या डॉक्टरांनी रुग्णाला कायमचे अपंगत्वच नशिबी मारले. बाळासाहेब देगडे यांच्यावर 16 सप्टेंबर 2015 रोजी शस्त्रक्रीया झाली त्यावेळी डॉक्टरांनी हा हलगर्जीपणा केला मात्र याची तसूभरही कल्पना नातेवाईक किंवा रुग्णाला दिली गेली नाही. शस्त्रक्रियेनंतर बाळासाहेब देडगे यांचा पाय काळा पडायला लागला, तेव्हा नातेवाईकांनी डॉक्टरांकडे त्याबाबत विचारणा 
 केली. त्यावेळी त्यांना गँगरीन झाल्याने त्यांचा पाय कापावा लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर 24 सप्टेंबरला दुसरी शस्त्रक्रिया करून पाय कापण्यात आला. या प्रकरणी सखोल माहिती घेतली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, अशी माहिती रुग्णाची बहीण सीमा पवार यांनी दिली.
पवार म्हणाल्या की, या डॉक्टरांना निलंबीत तर कारवेच शिवाय त्यांच्यावर पोलीस कारवाई देखील करण्यात यावी, कारण माझा भाऊ पायावर चालत दवाखान्यात गेला होता तो आज पूर्णपणे अपंग झाला आहे आता त्याच्या घरात तीन मुली, पत्नी व आई-वडील असे कुटुंब आहे. त्यांच्या घरात कोणीही कर्ता पुरुष नाही. त्यांची जबाबदारी कोण घेणार. यासाठी आम्ही राजकीय नेते, अधिकारी, आयुक्त यांच्याशी चर्चा केली, मात्र कोणीही 
मदतीसाठी पुढे येत नाही. डॉक्टर आम्हांला एक महिन्यापासूनच रुग्णाला घेवून जा, म्हणत आहेत, मात्र ठोस कारवाई होत नाही व काही मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. याबाबत वायसीएमचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, या प्रकारात प्रथमदर्शनी दोषी आढळलेले शल्यचिकित्सक डॉ. मनन सिंग यांना त्याच वेळी निलंबीत करण्यात आले आहे, व इतर दोघांवर कारवाई करण्याची शिफारस आम्ही महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे, मात्र अद्याप तसे कोणतेही आदेश आयुक्तांनी दिलेले नाहीत.