सागर पार्कवरील हॉकर्सबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी
जळगाव/प्रतिनिधी। 9 - शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत सागरपार्कवरील हॉकर्सबाबत तातडीने निर्णय घ्यावा. त्यांना पर्यायी जागा निश्चित होईपर्यंत सागरपार्कवरच व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी हॉकर्सतर्फे करण्यात आली. त्यावर गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनीदेखील 60 दिवसांपासून हॉकर्सचा व्यवसाय बंद आहे. या हॉकर्सच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने तातडीने हा विषय मार्गी लावावा, त्यांना पर्याय द्यावा. त्यांनी 5 पर्याय दिले आहेत. त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. उपमहापौरांनी तातडीने निर्णय घेऊन कळवितो, असे आश्वासन दिले.
या वेळी भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी गोलाणीत सुविधा नाहीत, तेथे जाणार नाही. त्याऐवजी जुन्या न.पा.च्या जागेवर बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. फुले मार्केट हॉकर्स प्रतिनिधींनीही तशीच मागणी केली. मात्र उपमहापौर सुनील महाजन यांनी अशा रीतीने जागा देता येणार नाही. मनपाला त्यावर काही बांधकाम करावयाचे असल्यास अडचण येईल, असे सांगितले. त्यावर मनपाने खाली जागा द्यावी. वर मजले बांधले तरी चालतील, असे मत मांडले. त्यावर अनंत जोशी यांनी तेथे तळमजला चालेल तर तयार असलेले गोलाणीतील ओटे का नको? असा सवाल केला. अँड.सूरज जहांगीर यांनी फेरीवाला धोरण व रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय परस्परविरोधी नाही. जनतेची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. असे मत मांडले. तर रोटरीचे अनंत भोळे यांनी या कार्यवाहीसाठी कालर्मयादा निश्चित करण्याची सूचना केली. त्यावर अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांनी 11 पर्यायी जागांचे नकाशे जवळपास तयार असून पाच-सहा दिवसात ते हॉकर्सना पाहण्यासाठी उपलब्ध असतील, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी 10-15 दिवसांत याबाबत अंतिम प्रस्ताव महासभेपुढे ठेवू, असे स्पष्ट केले.
शहरातील सर्व हॉकर्सनी फेरीवाला धोरणाच्या नियमानुसार बाय फूट जागेतच भाजीपाला टोपल्या ठेवाव्यात. टोपल्यांची संख्या कमी करा. लोखंडी पेट्या ठेवू नका. जास्त प्रमाणात माल साठवू नका, व्यवसाय झाल्यावर गाडी घरी घेऊन जा. वेळेचे बंधन पाळा, कचरा रस्त्यावर टाकू नका, आपल्या दुकानासमोर वाहतुकीला अडथळा होईल, अशा रीतीने वाहन उभे करू देऊ नका, अंडापावच्या गाडीवर कुणी मद्य प्राशन करताना आढळल्यास त्याची नोंदणी रद्द केली जाईल. त्याची काळजी घ्या, असे आवाहन केले.
मनपा आयुक्तांनी या वेळी चार ठराव मांडले. ते मंजूर करण्यात आले.
हॉकर्सने मोजकाच माल जवळ बाळगावा. दुकानातील मालासारखा साठा ठेवता येणार नाही. तसे आढळल्यास एक वेळ ताकीद देऊन पुढील वेळेस माल जप्त करून त्याचा लिलाव केला जाईल.
प्रत्येक हॉकरने स्वत:जवळ कचराकुंडी बाळगावी. आपला कचरा त्यात गोळा करून तो मनपाच्या कचराकुंडीत टाकावा. महिलांची गर्दी असेल तेथे त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, याची काळजी घेण्याची जबाबदारी हॉकर्सची असेल.
मनपा कर्मचारी त्यांचे कर्तव्य म्हणून तपासणीस अथवा कारवाईस आल्यास त्यांना शिवीगाळ अथवा मारहाण करता कामा नये. असे घडले तर संबंधिताला व्यवसाय करता येणार नाही. मनपा कर्मचार्यांनीही हॉकर्सला सन्मानाने वागवावे. कर्मचार्यांबाबत तक्रार असल्यास वरिष्ठांना कळवावे.