Breaking News

जिल्हा बँकेच्या 7 विद्यमान संचालकासह 23 जणांना निवडणूक बंदी

सांगली, 24 - सहकारी बँकातील कलंकित संचालकांवर निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा वटहुकूमाला मान्यता मिळाल्याने सांगली जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला भूकंपाचा हादरा बसला. यात 7 विद्यमान, तर 16 माजी दिग्गज संचालकांचा समावेश आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानुसार सहकार आयुक्तांनी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ 29 मार्च 2012 रोजी बरखास्त केले होते. बँकेवर सहनिबंधक (सहकारी संस्था) शैलेश कोतमिरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. गेल्या दहा वर्षात गैरकारभारामुळे बरखास्तीची कारवाई झालेल्या जिल्हा बँका व नागरी बँकावरील संचालकांना दहा वर्षे निवडणूक बंदी घालण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शिक्कामोर्तब करत वटहुकूम काढला. 
जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह सात संचालकांना पद सोडावे लागणार आहे. यामध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रा. सिकंदर जमादार, माजी अध्यक्ष बी. के. पाटील, माजी उपाध्यक्ष महेंद्र लाड यांचा समावेश आहे. मार्च 2012 मधील बरखास्त संचालक मंडळातील तत्कालीन अध्यक्ष दिनकरदादा पाटील, भाजपचे आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, अजितराव घोरपडे, विजय सगरे, दिलीप वग्याणी, इद्रिस नायकवडी या दिग्गजांनाही निवडणुकीस बंदी घातली जाणार आहे. अपात्र व दहा वर्षे निवडणुक बंदीतील आजी, माजी संचालकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी भाजप, सेनेच्या नेत्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह सात संचालकांना अपात्रतेच्या नोटिसा कोल्हापूर विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांच्याकडून बजावण्यात येणार असून खुलासे सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर अपात्रतेची कारवाई होईल असे सूत्रांनी सांगितले.