Breaking News

आदर्शगाव हिवरेबाजारच्या सभेत महत्त्वपुर्ण निर्णय - -विद्यापीठाच्या टाईमपास करणार्‍या विद्यार्थ्यांना हिवरेबाजारमध्ये प्रवेश बंद



 अहमदनगर । प्रतिनिधी । 04 - आदर्श  गाव हिवरेबाजार मध्ये झालेल्या ग्रामसभेत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून यात प्रामुख्याने गावात सर्वेक्षणासाठी येणार्‍या विद्यापीठाचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी गांभीर्याने सर्वेक्षण करत नाहीत. यामुळे यापुढे गावात टाईमपास करणार्‍या विद्यार्थ्यांना हिवरेबाजारमधील प्रवेश बंद करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आला आहे. यासह 2015-16 चा गावातील पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे वाटचाल करण्याचे ठरविण्यात आले आहे. 
सभेच्या अध्यक्षस्थानी नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले होते. यावेळी कृषी उपसंचालक बाबासाहेब कराळे, कृषी अधीक्षक अंकुश माने, मधुकर बोराळे, बाळासाहेब नितनवरे, सहायक पोलीस निरीक्षक  विनोद पाटील, ऋषिकेश गोस्की यांच्यासह अधिकारी आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 
सुरुवातीला ग्रामसेवक सचिन थोरात यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्यांनतर विषय पत्रिकेवरील विषयानुसार सभा झाली. यात पोपटराव पवार यांच्या राज्यभर प्रवासाचे धोरण निश्‍चित करण्यात आल आहेे. हिवरेबाजारमध्ये आजपर्यंत अनेक महाविद्यालय, विद्यापीठाचे विद्यार्थी सर्वेक्षणासाठी येतात. मात्र, हे विद्यार्थी गांभीर्याने सर्वेक्षण करत नसल्याने यापुढे टाईमपास करण्यार्‍या विद्यार्थ्यांना हिवरेबाजारमध्ये प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 गावातील पिण्याचे पाणी व त्यातील वाढते क्षार यावर उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक पाणी शुद्धीकरण प्लॅँट की व्यक्तिगत पाणी शुद्धीकरण यंत्रे बसवायचे, याबाबत चर्चा करण्यात आली. 
गावात तयार होणारे दूध व भाजीपाला गावच्या ब्रॅँडने विकणे यावर चर्चा झाली. गावातील 25 टक्के शेती ही नैसर्गिकरित्या करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. या विषयासोबत गावातील मंगल कार्यालय देखभाल दुरुस्ती, अटल पेन्शन योजनेत समाविष्ट होण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे. 
पाण्याचा ताळेबंद एकूण पर्जन्यमान 255 मि.मी.*  एकूण पाणी 249 कोटी लीटर * बाष्पीभवन होणारे पाणी 87.18 * जमिनीवर साठणारे पाणी 12.45 * मुरणारे पाणी 24.11 * ओलावा स्वरुपात राहणारे पाणी 74.73 * जलसंधारण कामामुळे मुरणारे पाणी 49.82 *  पिण्यासाठी आवश्यक पाणी 4.27 लि. पाण्याचे धोरण ठरविण्यात आले.