Breaking News

आमिष दाखवून पैसे उकळणार्‍या संस्थांविरुद्ध गुन्हे


 देवळाली कॅम्प/प्रतिनिधी। 11 - गेल्या चार वर्षांपूर्वी इमू, आयएमएस या दामदुप्पट योजनांविरूद्ध नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होऊ शकली नाही. अद्यापही याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलीस सांगतात. मात्र शासनाचे विविध खात्यांची परवानगी घेत विविध प्रकारचे कर शासनाला देत वस्तू वाढ विक्री योजनेविरूद्ध कारवाईचा बडगा पोलीस प्रशासनाचे दुटप्पी धोरणच स्पष्ट करत आहे. 
वस्तूंचे आमिष दाखवून पैसे उकळणार्या योजनांद्वारे लोकांची फसवणूक होण्यापूर्वीच त्या संस्थांवर गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. फ्लॅट, वाहने, दागिने व एलसीडी अशा विविध वस्तूंची वस्तू वाढ विक्री योजना नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असताना या योजनांवर देवळालीत कारवाई केल्याने पोलीस प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाची चर्चा ठिकठिकाणी रंगत आहे. देवळाली कॅम्पमधील पाच संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिंडोरी, निफाड, इगतपुरी, सिन्नर, चांदोरी, सायखेडा यांसह नाशिक शहरात अंबड, नाशिकरोड, चेहेडी या परिसरातसुद्धा वस्तू वाढ विक्री योजना मोठया प्रमाणात सुरू आहे. ग्रामीण भागातून वस्तू विक्री वाढ योजनांप्रमाणे शहर परिसरातही सुरू झाल्या आहेत. अनेकांनी मोठमोठया बक्षिसांच्या आमिषाने या योजनेत भाग घेतल्याचे दिसते. केबीसी व इमू यांसारख्या योजनांनंतरही शहरात अशा विविध योजनांचा सुळसुळाट आहे. परिमंडळ दोनचे उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने देवळाली कॅम्प पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. योजनांद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी शासनाने प्रत्येक पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे कक्षाची निर्मिती केली आहे. कोणत्याही माध्यमातील जाहिरातीद्वारे आमिष दाखविणार्यांची माहिती मिळवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्हा माहिती अधिकार्यांनी पोलीस आयुक्त व अधीक्षकांना अशी माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. 
सध्या नाशिक शहरात विविध नावांना धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करून योजना सुरू करण्याची स्पर्धा सुरू आहे. काहीजण एकत्र येऊन योजना सुरू करतात. या योजनेत ठरावीक सभासद गोळा करण्यासाठी एजंटांची नेमणूक केली जाते. नागरिकांकडून 500, 600, 700 अशी रक्कम टप्प्याटप्प्याने घेतली जात आहे. या मोबदल्यात त्यांना फ्लॅट व वाहनांसह दागिने, एलसीडीसारख्या वस्तूंचे आमिष दाखविले जात आहे.