Breaking News

गोळ्यांना उत्तर गोळ्यांनीच देऊ - आ. राणे


पुणे, 8 - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना ट्विटरवरून धमकी देण्यात आली. त्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस आमदार नितेश
राणे यांनी सबनीस यांची काल पुण्यात भेट घेतली. गोळ्यांचे उत्तर गोळ्यांनीच देऊ, असे ठणकावून सांगत नितेश यांनी सबनिसांना पाठिंबा दिला.
 मी सबनिसांसोबत मॉर्निंग वॉकला जायला तयार आहे. सबनीस भाषणात काय चुकीचे बोलले? ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते.  संमेलनाच्या अध्यक्षांना अशा प्रकारची धमकी मिळणे ही चिंतेची बाब आहे. विचारांची लढाई ही विचारांऐवजी आता गोळ्यांनी खेळली जात आहे. आम्हीही गोळ्यांचे उत्तर गोळ्यांनी देऊ शकतो. श्रीपाल सबनीस यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना धमक्या देणा-यांना जशास तसे उत्तर देऊ. साहित्यिकांना धमक्या येणे हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. आवश्यकता भासल्यास सबनिसांना साहित्य संमेलनात सुरक्षा पुरवू, असेही नितेश यावेळी म्हणाले. सनातन संस्थेचे संजीव पुनाळेकर यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. पुनाळेकर हे वकील आहेत की कसाई हे माहित नाही. मात्र त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देऊ, असेही राणे म्हणाले.