Breaking News

शेतात ठिबकचा वापर करणे काळाची गरज : ना. पाटील


सातारा, 11 - जलयुक्त शिवाराच्या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून प्रत्येक शेतकर्‍याने शेतात ठिबकचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 
निढळ ता. खटाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात सहकारमंत्री पाटील बोलत होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंखे, जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदिप विधाते, सरपंच श्रीरंग निर्मळ उपस्थित होते. 
ग्रामीण भागाचा विकास झाला तर शहराकडे येणारे लोकांचे लोंढे थांबतील, असे सांगून ना. पाटील म्हणाले, पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत मुरला पाहिजे. जलयुक्त शिवार अभियानातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामधून जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. उत्पादीत मालाला चांगला भाव मिळायचा असेल तर प्रक्रिया करुन बाजारपेठ मिळाली पाहिजे. त्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरु करा. मागेल त्याला गोदाम आणि शितगृह आम्ही देवू.  निढळ गावचा झालेला विकास पाहून खूप आनंद झाला. या गावाचा इतर गावांनी आर्दश घ्यावा. या गावात महिला बचत गटांची संख्या खूप आहे. महिला बचत गटांनी पापड व लोणचे बनविण्याच्या उद्योगाच्या चौकटीत न राहता इतर मालही तयार करून आपली आर्थिक उन्नती साधावी. निढळ गावाच्या विकासाबरोबर इतर गावांच्या विकासासाठी पणनच्या माध्यमातून निढळ गावात शितगृहासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. 
आमदार शिंदे यांनी निढळ गावाच्या परिसरातील गावांच्या रस्त्यांच्या कामासाठी निधीची मागणी केली. आमदार घार्गे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकारी संस्थांना करण्यात येणार्‍या पतपुरवठ्याची माहिती दिली. तर सहकार आयुक्त दळवी यांनी प्रास्ताविकात निढळ गावच्या विकासाची माहिती दिली.