Breaking News

अग्नीशमन कर्मचार्‍यांना विमा सरंक्षण मिळणार

 अहमदनगर । प्रतिनिधी । 31 -  महापालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांना यापुढे विमा संरक्षणाचे कवच मिळणार आहे. विमा रकमेची अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो मंजुरीस्तव स्थायी समितीकडे पाठविला आहे.
महापालिकेचे सावेडी, केडगाव व शहरात अशा तीन ठिकाणी अग्निशमन केंद्र आहेत. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या अग्निशमन विभागातील हे कर्मचारी तत्परतेने धावून जातात. स्वत:चा जीव धोक्यात घालून आग विझविणार्‍या या कर्मचार्‍यांचा जीव मात्र आजवर वार्यावर होता. राज्य शासनाच्या अग्निशमन सल्लागाराने अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांचा विमा आवश्यक असल्याचे पत्र जून 2015 मध्ये पाठविले. त्यानंतर महापालिकेला जाग आली. महापालिकेने अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांची पदनिहाय माहिती पाठवून त्यांच्याकडून मार्गदर्शन मागविले असता 3 कोटी 71 लाख रुपयांचा समूह वैयक्तिक अपघात विमा उतरविण्याचे सूचविण्यात आले. त्यासाठी 1 लाख 37 हजार रुपयांचा हप्ता महापालिकेला भरावा लागणार आहे. 
ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचार्यांना विमा संरक्षण असून त्याचा हप्ता अर्थसंकल्पात तरतूद करून भरला जातो. त्याच धर्तीवर आता अहमदनगर महापालिकाही अग्निशमन विभागातील कर्मचार्यांचा हप्ता भरणार आहे. मात्र 2015-16 च्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली नाही. 
गत अर्थसंकल्पात तरतूद नसली तरी सुधारीत अर्थसंकल्पात तरतूद करावी, असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील 39 कर्मचार्‍यांना या विमा संरक्षणाचे कवच मिळणार आहे.