Breaking News

अनैतिक संबंधातून पतीचा खून; पत्नीसह चौघांना जन्मठेप

 अहमदनगर । प्रतिनिधी । 31 -  राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील गणपत अहिलाजी शिगांडे याचा त्याची पत्नी ज्योती व इतर तिघांनी मिळून खून केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. खुन प्रकरणात फिरोज अकबर शेख (वय 38),ज्योती गणपत शिंगांडे (वय 30), राजू भाऊसाहेब दिघे (वय 25), बाबासाहेब सबाजी बरे (वय 33) अशी आरोपींची नावे होती. आरोपीविरुध्द येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. तदर्थ जिल्हा न्यायाधिश क्र. 2 श्रीमती आर.व्ही.सावंत-वाघुले यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. वरील चौघा आरोपींना दोषी धरुन भादवि.का.क.302 सह 34 नुसार जन्मठेप व प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील सौ.पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले.
खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, सुभाष अहिलाजे शिंगांडे घटनेतील मयत गणपत शिंगांडे याची पत्नी व मुले तसेच सुभाष यांचे आई-वडिलांसह कोंबडवाडी येथे राहत होते. सुभाष शिंगांडे यांच्या घरासमोर फिरोज अकबर शेख याचे किराणा दुकान होते. दरम्यान, सुभाष शिंगांडे यांचे आई-वडिल व मयत गणपत शिंगांडे हे कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर आरोपी ज्योती शिंगांडे एकटीच राहत होती. त्यावेळी आरोपी फिरोज शेख हा या घटनेतील महिला आरोपी ज्योती हिच्या घरी येत असे त्यामुळे मयत गणपत याने आरोपी शेख याच्या वैतागामुळे घर सोडून दुसरीकडे राहवयास गेला होता. तरी देखील आरोपी शेख हा मयताच्या घरी येत असे. या घटनेप्रकरणी शेख व ज्योती शिंगांडे यास अनेक वेळा समजावून सांगितले. मयत गणपत हा अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी फिरोज अकबर व ज्योती शिंगाडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. 29 जुन 2013 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास मयत गणपत याने फोन करुन त्याचा भाऊ सुभाष (फिर्यादी) याला बोलावून घेतले. व त्यावेळी त्याने सदर घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास वरवंडी शिवारात फिरोज शेख, बाबासाहेब दिवे हे चर्चा करतांना दिसले. शेख याच्या हातात सुताची दोरी होती. रात्री 12 च्या सुमारास भास्कर काळे हे इलेक्ट्रीक मोटार बंद करण्यासाठी धरणाकडे जात असतांना मयत गणपत, आरोपी शेख, ज्योती शिंगाडे, बरे, व दिवे बोलतांना पाहिले होते. मयत गणपत हे हालचाल करत नाही, असे सांगितले. 
दरम्यान, मयत गणपत याच्या डोक्यावर व गळ्यावर जखमा होत्या. या घटनेची माहिती राहुरी पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलिस हजर झाले. त्यांनी गणपतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी तपास करुन अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्यामुळे वरील चौघांनी कटकारस्थान करुन गणपत शिंगांडे यास दोरीने गळफास देऊन डोक्यात मारुन त्याचा खून केला. अशी फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली होती. कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील सौ.पुष्पा कापसे यांनी 13 साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने राजकुमार आघाव, भास्कर काळे, बाबा देवकाते, व डॉ.राजेंद्र वैरागर यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपींनी खुनाचा गंभीर गुन्हा केला असल्याबाबत निदर्शनास आणून देऊन कारावासाची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने वरील शिक्षा ठोठावली.