पाकिस्ताने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करावे - बराक ओबामा
वॉशिंग्टन, 24 - पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानंच उध्वस्त करु शकतो; आणि ही कृती पाकिस्तानने करावीच,“ असा संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रविवारी पाकिस्तानास दिला.
पठाणकोट येथे झालेला दहशतवादी हल्ला हा असमर्थनीय दहशतवादाचे आणखी एक उदाहरण असल्याचे ओबामा यांनी सांगितले. याचबरोबर, या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी साधलेल्या संवादाची ओबामांनी प्रशंसा केली.
पठाणकोट येथील हल्ल्याचा भारताप्रमाणेच अमेरिकेनेही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. याचबरोबर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात इतरांच्या जीवांचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या भारतीयांना आमचा सलाम आहे. किंबहुना अशा स्वरुपाच्या घटनांमधून दहशतवादाविरोधातील लढाई लढणार्या भारत व अमेरिकेमधील भागीदारीचे महत्त्व अधिक गंभीरतेने जाणवते. आता दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करुन दहशतवादाविरोधातील लढाईसंदर्भात आपण गंभीर
आहोत, हे दाखविण्याची पाकिस्तानला संधी आहे. या भागामध्ये व एकंदरच जगामध्ये दहशतवाद्यांना कडक शासन करण्यासंदर्भातील समान धोरणाची आवश्यकता आहे, असे ओबामा म्हणाले.