Breaking News

सात दिवसात मिळेल पासपोर्ट

पुणे (प्रतिनिधी), 29 -  नव्याने पासपोर्ट काढताना अर्जदाराकडे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र व पॅनकार्ड ही तीन कागदपत्रे असतील आणि अवघ्या सात दिवसात त्याला पासपोर्ट मिळू शकेल. पासपोर्ट प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी यापुढे पासपोर्ट अर्जदाराच्या हातात पडल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे. ’पासपोर्ट प्रक्रियेचे सॉफ्टवेअर आधारकार्डशी जोडल्यामुळे हे शक्य झाले आहे. अर्जदाराने दिलेली माहिती आणि आधारकार्ड, पॅनकार्डवरील माहिती जुळणे यासाठी आवश्यक आहे,’ अशी माहिती पुणे विभागाचे प्रमुख पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.
नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍या या नागरिकांना ’अ‍ॅनेक्शर आय’ हा अजून एक अर्ज भरावा लागणार आहे. ’माझ्या नावावर पोलीस चौकीत कोणतीही तक्रार दाखल नसून खोटी माहिती दिल्यास मी शिक्षेस पात्र असेन,’ अशी स्वतःची जबाबदारी घेणारा हा अर्ज असेल. या सर्व निकषांमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांचे पोलीस व्हेरिफिकेशन पासपोर्ट घरी आल्यानंतर होईल. सध्या पुणे विभागातून नियमित पासपोर्टासाठी अर्ज करणार्‍या अर्जदारांचे पोलीस व्हेरिफिकेशन होण्यास किमान 21 ते 40 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र, यापुढे आधारकार्डसह इतर कागदपत्रांची पूर्तता करणार्‍या व्यक्तींना लवकरच पासपोर्ट मिळेल, असे गोतसुर्वे यांनी सांगितले.
पोलिसांकडून अर्ज पडताळणीची प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने सुरू असल्याने पासपोर्ट मिळण्यास तीन ते आठ महिन्यांचा कालावधी लागत होता. पासपोर्ट प्रक्रियेस सर्वाधिक विलंब करणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होता. हा विलंब टाळण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये बदल केले आहेत. नवीन प्रक्रिया सुलभ असली, तरी पासपोर्ट आल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी यापुढे नागरिकांची असेल. पासपोर्ट ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांनी संबंधित पोलीस चौकीकडून लवकरात लवकर पोलीस व्हेरिफिकेशन करुन घेणे बंधनकारक आहे. अन्यथा पासपोर्टधारकाला कारवाईला सामोरे जावे लागेल.