Breaking News

मानवाच्या जीवनात पुस्तकाचे अविभाज्य स्थान : संजीव देशमुख

सातारा, 1 -  सातारा जिल्ह्यामध्ये खेळ, संस्कृती, वाचन याची आवड चांगली आहे. अशा ग्रंथमहोत्सवांमुळे सातार्‍यात कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते. मानवाच्या जीवनात पुस्तकाचे अविभाज्य स्थान आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी केले.
सातारा येथील अजिंक्य सांस्कृतीक भवन, अजिंक्य कॉलनी, सदरबजार येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या तर्फे ग्रंथोत्सव 2015 चे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथोत्सव व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथपूजनाने देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे हे होते. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्रतापसिंह हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शबनम मुजावर, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य रवींद्र बेडकीहाळ, तांत्रिक सहाय्यक सीमा गांगण, ग्रंथालय निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक, धरमसिंग वळवी, कार्यवाह नंदा जाधव आदी यावेळी उपस्थित होत्या. 
देशमुख म्हणाले, मृत्युंजय कादंबरीचे वाचन केल्यावरच त्याची महती आपल्याला कळते. सातारा जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन हे नेहमीच केले जाते. अशा ग्रंथोत्सवात वेगवेगळ्या  पुस्तकांचे विक्री स्टॉल लागत असतात यामुळे जिल्ह्यात कोटीने पुस्तकांची उलाढाल होते. आपल्या जीवनात पुस्तक हे अविभाज्य आहे. या जिल्ह्यामध्ये खेळ, संस्कृती, वाचन यांची आवड चांगली आहे. यामुळे चांगले ज्ञान प्राप्त होते. यावेळी त्यांनी ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षिय भाषणात प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, जिल्ह्यात ग्रंथोत्सव हा लोकमहोत्सव होत चालला आहे याची प्रचीती येते. ग्रंथ हाच माझा श्‍वास आहे. उत्सवांना देखील ग्रंथोत्सव हा सुंदर चैतन्य देत असतो. यामुळे जीवनात चांगली फळे मिळत असतात. चांगल्या संस्कारामधून निष्ठावंत वाचक निर्माण झाला पाहिजे. मन हे नेहमी ग्रंथात घुसळावे लागते तेंव्हा चैतन्य निर्माण होते. वाचलेल्या पुस्तकांचे मोल हे नेहमीच मोठ असतं. चांगली पुस्तके वाचल्याने जो आनंद मिळतो तोच आत्मानंद असतो. ग्रंथामध्ये जीवनाला आकार देण्याचे सामर्थ्य असते. वाचन संस्कृतीची चळवळ ही ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून होत असते. जीवनात साहित्य हे नेहमीच चांगले असते त्याचा मृत्यू कधी होत नसतो. पुस्तक वाचल्याने लेखकांशी मैत्रीच नातं निर्माण होते. समाजात संस्कृती कमी होत असून माणसाने नेहमी माणसासारख बघितल पाहिजे. शब्दामध्ये चांगले सामर्थ्य असते. दृष्टीची व्यापकता ग्रंथ देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी मंगेश पाडगावकर, द. भी. कुलकर्णी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, शबनम मुजावर, डॉ. राजेंद्र माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सहाय्यक ग्रंथालय संचालक धरमसिंग वळवी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुनिता कदम यांनी केले तर ग्रंथालय निरीक्षक सुनील पाटील यांनी आभार मानले. यावेळी साहित्यिक, जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.