Breaking News

जावली तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटीचा निधी

सातारा, 1 -  जावली तालुक्यातील अत्यंत खराब झालेल्या राज्य मार्ग व काही प्रमुख जिल्हामार्ग दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 2 कोटी 60 लाख रुपयांचा निधी रस्ते दुरुस्तीमधून मंजूर झाला आहे. यामुळे सातारा ते महाबळेश्‍वर, बामणोली ते तापोळा, पाचवड ते मेढा आणि पाचगणी ते कुडाळ या प्रमुख रस्त्यावरील खराब लांबीच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागणार आहे. 
सातारा ते महाबळेश्‍वर रस्त्यावर मोरावळे ते चिंचणी आणि चिंचणी ते कोंडवे याठिकाचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. कास बामणोली ते तापोळा या रस्त्यावर बामणोली ते म्हावशी आणि म्हावशी ते तेटली या भागात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. याही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 60 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. पाचवड ते मेढा या रस्त्यावर सावंतवाडी ते सोनगाव या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 60 लाख तर, पाचगणी ते कुडाळ या रस्त्यावरील हुमगाव ते कुडाळ या भागाच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये निधी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मंजूर करुन घेतला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते दुरुस्ती निधीमधून मंजूर करुन घेतला असून या सर्व रस्त्यांच्या दुुरुस्तीचे काम लवकरच सुरु होणार आहे. 
जावली तालुक्यातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. बहुतांश गावे डांबरी रस्त्याने तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेढा गावास जोडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत, त्याचीही दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्नशील असून जावली तालुक्यातील नागरिकांना दळणवळणाची अडचण भासू देणार नसल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमीत्ताने सांगितले. दरम्यान, मंजूर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे दर्जेदार आणि लवकर पुर्ण करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या.