हॉटेल उद्योग उभारण्यासाठी गृह विभागाशी संबंधित 5 परवानग्या रद्द - मुख्यमंत्री
मुंबई, 31 - हॉटेल उद्योग उभारण्यासाठी गृह विभागाशी संबंधित 5 परवानग्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या
निर्णयामुळे राज्यातील हॉटेल आणि आदरातिथ्य उद्योगाला चालना मिळणार आहे. राज्याच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘इज ऑफ डुइंग
बिझनेस’ या मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्र्यंनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षभरात उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक असणार्या परवानग्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी केल्या आहेत. यापूर्वी उद्योग, नगरविकास,
पर्यावरण आदी विभागांच्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली होती. आता या मोहिमेला गृह विभागाकडूनही पाठबळ मिळाले आहे.
गृह विभागाने मुंबई पोलिस अधिनियमांतर्गत तयार केलेल्या नियमानुसार हॉटेल व आदरातिथ्य उद्योगांना आता खाद्य नोंदणी प्रमाणपत्र, स्विमिंग पूल
परवाना, सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणासाठी परवाना पीपीईएल - ए तसेच पीपीईएल - बी आणि सादरीकरण परवाना या पाच परवानग्या घेण्याची
आवश्यकता राहणार नाही. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. या परवानग्या रद्द करण्यात आल्यामुळे
हा उद्योग सुरू करण्यासाठी येणार्या विविध अडचणी व लागणारा विलंब कमी होणार असून अनावश्यक कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही.